जिल्ह्यातील पाच बाजार समितीत अप्रशासकीय मंडळ
By Admin | Updated: November 13, 2014 22:55 IST2014-11-13T22:55:46+5:302014-11-13T22:55:46+5:30
जिल्ह्यातील १३ कृषी उत्पन्न बाजार समितींपैकी प्रशासक मंडळ नेमण्यात आलेल्या पाच आणि मुदतवाढ देण्यात आलेल्या दोन बाजार समिती बरखास्त करण्याबाबतचे आदेश जिल्हा उपनिबंधक

जिल्ह्यातील पाच बाजार समितीत अप्रशासकीय मंडळ
अमरावती : जिल्ह्यातील १३ कृषी उत्पन्न बाजार समितींपैकी प्रशासक मंडळ नेमण्यात आलेल्या पाच आणि मुदतवाढ देण्यात आलेल्या दोन बाजार समिती बरखास्त करण्याबाबतचे आदेश जिल्हा उपनिबंधक कार्यालयात धडकले आहे. यामध्ये पाच बाजार समितीवर अप्रशासकीय मंडळ नियुक्त केले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये अनियमितता आणि शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे अमरावतीसह राज्यातील सुमारे १७० कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रत्यक्ष कार्यवाहीबाबतचा आदेश आता धडकल्याने जिल्ह्यातील सात बाजार समिती बरखास्त करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. सहकार मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार, जिल्ह्यात अमरावती, अचलपूर, नांदगाव खंडेश्वर, तिवसा, अंजनगाव सुर्जी या पाच बाजार समित्यांवर सध्या अप्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे. वरूड आणि दर्यापूर या दोन बाजार समितींच्या संचालक मंडळाला मुदतवाढ मिळालेली होती. याही दोन बाजार समिती आता बरखास्त होणार आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील सातही बाजार समिती बरखास्त करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात एकूण १३ कृषी उत्पन्न बाजार समिती अस्तित्वात आहेत.
गेल्या काही वर्षांत कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दलालांचा सुळसुळाट झाला आहे. याशिवाय अनियमितता आणि शेतकऱ्यांच्या अडवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा निर्णय जाहीर करताच आघाडी सरकारमधील काँगे्रस व राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितींचे भवितव्य धोक्यात आले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे या बाजार समित्यांच्या माध्यमातून राजकारणाची पोळी शेकणाऱ्यांनाही हादरा बसला आहे. परिणामी या बाजार समितीच्या येत्या काही महिन्यांतच निवडणुका होणार आहेत.