गायवाडीच्या सरपंचावरील अविश्वास प्रस्ताव बारगळला
By Admin | Updated: July 14, 2016 00:23 IST2016-07-14T00:23:55+5:302016-07-14T00:23:55+5:30
तालुक्यातील गायवाडी येथील सरपंच संगीता घाणे यांच्या विरोधात अविश्वास ठरावाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता.

गायवाडीच्या सरपंचावरील अविश्वास प्रस्ताव बारगळला
दर्यापूर: तालुक्यातील गायवाडी येथील सरपंच संगीता घाणे यांच्या विरोधात अविश्वास ठरावाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. पण बुधवारी झालेल्या विशेष सभेत सरपंच विरोधात एकूण सदस्यसंख्येच्या तीनचतुर्थांश प्रमाणात बहूमत सिध्द न झाल्याने अखेर हा प्रस्ताव बारगळला आहे.
गायवाडी ग्रामपंचायतीच्या विकासात्मक कामात अडथळा निर्माण होत असल्याच्या कारणावरुन येथील उपसरपंच्यासह ११ सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव ८ जूलै रोजी तहसीलदार राहूल तायडे यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार बुधवारी गायवाडी ग्रामपंचायत सभागृहात विशेष सभा घेण्यात आली.
गायवाडी ग्रामपंचायतीची एकूण १५ सदस्य संख्या आहे. या ठिकाणी महिला सरपंच असल्याने नियमानुसार सदस्य संख्येच्या तीन चतुर्थांश म्हणजे ११ सदस्य अविश्वास ठराव्याच्या बाजूला पाहिजे होते. पण वेळेवर एक सदस्य अनुपस्थित राहल्यामुळे हा ठराव बारगळला व सरपंच संगीता घाणे यांचे पद कायम राहीले. या प्रकरणात विद्यमान सरपंचांनी ग्रामपंचायत वरील आपली पकड सिध्द केली. दिवसभर या घटनेचे चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (प्रतिनिधी)