अचलपूर नगरपालिका क्षेत्रात १३ वर्षांपासून कर आकारणीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:17 IST2021-06-16T04:17:19+5:302021-06-16T04:17:19+5:30
परतवाडा : मागील १३ वर्षांपासून अचलपूर नगरपालिका क्षेत्रातील बांधकाम पूर्ण झालेल्या अनेक नव्या इमारतींचे असेसमेंट करून त्यावर नगर ...

अचलपूर नगरपालिका क्षेत्रात १३ वर्षांपासून कर आकारणीच नाही
परतवाडा : मागील १३ वर्षांपासून अचलपूर नगरपालिका क्षेत्रातील बांधकाम पूर्ण झालेल्या अनेक नव्या इमारतींचे असेसमेंट करून त्यावर नगर परिषदेकडून कराची आकारणी करण्यात आलेली नाही. यामुळे नगरपालिकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे, अशी तक्रार रिपाइं अचलपूर शहर अध्यक्ष किशोर मोहोड यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.
२००९ ते २०२१ पर्यंत नगरपालिकेने त्या इमारतींचे बांधकामाचे असेसमेंट केलेले नाही. त्यावर कर आकारला नाही. यात दवाखान्याचे बांधकाम, उद्योग संबंधित बांधकाम तसेच भव्य इमारतींचा समावेश असल्याचे तक्रारीत नमूद आहे. ज्या नागरिकांचे वास्तव्य नझुलच्या जागेवर आहे, अशा घरांना कर लावण्यात यावा. घरकुल योजना, रमाई आवास योजना, आणि प्रधानमंत्री आवास योजनेतून पूर्ण बांधकाम झालेल्या घरकुलांनाही कर लावण्यात यावा. अनेकांकडे कराची पावती नसल्यामुळे त्यांना शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. पीआर कार्ड मिळविण्यातही नागरिकांना अडचणी येत असल्याचे किशोर मोहोड यांचे म्हणणे आहे.
नगरपालिकेने कराची आकारणी करून आर्थिक नुकसान थांबवावे. संबंधितांना कराची पावती द्यावी, अन्यथा रिपाइं अचलपूर शहरच्यावतीने उग्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही मोहोड यांनी निवेदनातून मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे.
दि 14/6/21 / फोटो नगरपालिकेचा