रेल्वेमध्ये उन्हाळ्यात ‘नो रुम’ मुंबई एक्स्प्रेस हाऊसफुल्ल : सुट्या, लग्नप्रसंगांची धूम
By Admin | Updated: March 29, 2015 00:41 IST2015-03-29T00:41:10+5:302015-03-29T00:41:10+5:30
उन्हाळा सुरु होताच रेल्वे, एसटीमध्ये प्रवाशांची गर्दी वाढते.

रेल्वेमध्ये उन्हाळ्यात ‘नो रुम’ मुंबई एक्स्प्रेस हाऊसफुल्ल : सुट्या, लग्नप्रसंगांची धूम
अमरावती : उन्हाळा सुरु होताच रेल्वे, एसटीमध्ये प्रवाशांची गर्दी वाढते. मात्र, यावर्षी १५ एप्रिलपासून रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण मिळणे कठीण आहे. मुंबई, हावडा, दिल्ली, पटना, चैन्नई, अहमदाबाद कडे ये- जा करणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये ‘नो रुम’ झळकत आहेत.
शाळा, महाविद्यालयांना सुट्या लागल्या की, बाहेर गावी जाण्याने नियोजन केले जाते. एप्रिल महिन्यात शाळांना सुट्या लागणार आहेत. त्यानुसार प्रवासाचे नियोजन आखत असताना अनेकांना रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षणाचे ‘नो रुम’ झळकत असल्याने प्रवासाचे नियोजन बदलविण्याचा प्रसंग ओढावत आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये एप्रिलमध्ये आरक्षण मिळणे दुरापास्त झाले आहे, २१ एप्रिलपर्यंत लग्न प्रसंगाचा मोसम असून या कालावधीत प्रवास करणाऱ्यांची संख्या बरीच मोठी राहणार आहे. एप्रिल, मे महिन्यात ‘समर स्पेशल’ रेल्वे गाड्या सुरु करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला असला तरी गर्दी बघता या गाड्यांमधेही आरक्षण मिळणे कठीण आहे. २१ एप्रिलनंतर ये- जा करणाऱ्यांची संख्या बरीच राहणार आहे. काहींनी प्रवासाचे नियोजन म्हणून दोन महिन्यापुर्वीच आरक्षण करुन ठेवले आहे. परंतु वेळेवर प्रवास करण्याचे नियोजन आखणाऱ्यांना हल्ली आरक्षण मिळणे कठीण आहे. विदर्भ एक्सप्रेस आणि अमरावती एक्सप्रसचे वेटींग लिस्ट ही २०० ते ३०० च्या वर पोहचली आहे.
एप्रिलपासून चार महिने अगोदर आरक्षण
रेल्वे प्रशासनाच्या नवीन निर्णयानुसार १ एप्रिलपासून चार महिने अगोदर रेल्वे गाड्यांचे आरक्षण करण्याची सोय करण्यात आली आहे. यापुर्वी केवळ दोन महिने पुर्वीच गाड्यांचे आरक्षण करता येत होते. मात्र, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी चार महिने पूर्वी रेल्वेचे आरक्षण करता येईल, अशी घोषणा केली होती. या घोषणेची अंमलबजावणी एप्रिलपासून सुरु होत आहे.