रेल्वे पोलिसांना न जुमानता ‘नो पार्किंग झोन’मध्ये वाहने
By Admin | Updated: May 20, 2016 00:09 IST2016-05-20T00:09:58+5:302016-05-20T00:09:58+5:30
रेल्वे स्थानक परिसरात येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था असतानाही बहुतांश वाहनचालक नो-पार्किंगमध्ये वाहने लावतात.

रेल्वे पोलिसांना न जुमानता ‘नो पार्किंग झोन’मध्ये वाहने
प्रशासनाची हतबलता : रेल्वे स्थानक परिसरात पुन्हा नियमांचे उल्लंघन
अमरावती : रेल्वे स्थानक परिसरात येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था असतानाही बहुतांश वाहनचालक नो-पार्किंगमध्ये वाहने लावतात. नो-पार्किंगमध्ये वाहने लावताना रेल्वे पोलीस वाहनधारकांना हटकतातसुध्दा. मात्र, त्यांनाही न जुमानता वाहनधारक नोपार्किंगमध्ये वाहन लावून रेल्वे स्थानकाच्या आत जातात. हे वास्तव ‘लोकतम’ने केलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. त्यामुळे नोपार्किंग वाहने लावणाऱ्याविषयी रेल्वे पोलीस प्रशासन हतबल असल्याचे दिसून येते.
मुंबई व पुण्यासारख्या मोठ्या शहरातील रेल्वे स्थानकावर दहशदवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून अनेकदा राज्यभरातील रेल्वे स्थानकांना सतर्कतेच्या सूचनासुद्धा देण्यात आल्या आहेत. मात्र, अमरावती रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. अमरावतीच्या मॉडेल रेल्वे स्थानकावरून आता अनेक शहरांकडे जाणाऱ्या रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विविध राज्यांतील नागरिक अमरावतीत येतात. त्यामुळे वर्दळ वाढली आहे. अशाप्रसंगी सुरक्षेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना प्रशासनाने करणे आवश्यक आहे. मात्र, रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूने पानटपऱ्या लागल्या आहेत. त्यामुळे नेहमीच तेथे नागरिकांची वर्दळ असते. तसेच आॅटो चालकांची गर्दीसुध्दा वाढली आहे. त्यातच नातेवाईकांना रेल्वेस्थानकावर सोडण्यासाठी येणारे बहुतांश नागरिक दुचाकी पार्किंगमध्ये न लावता नो-पार्किंगमध्येच लावत आहेत. रेल्वे स्थानकात पार्किंगची झोनची व्यवस्था असतानाही बहुतांश नागरिक नो-पार्किंगमध्येच वाहने लावत आहेत. रेल्वे प्रशासनातर्फे तेथे पोलीस तैनात करण्यात आले आहे. मात्र, नो-पार्किंगमधील वाहनांकडे त्यांचे विशेष लक्ष नसल्याचे आढळून येत आहे. दिवसभरात शेकडो वाहने नो-पार्किंगमध्ये लागतात. एखाद्याच वेळी पोलीस अशा वाहनधारकांना हटकताना दिसतात. मात्र, त्यांना न जुमानता वाहनधारक वाहने लावून बिनधास्त रेल्वेच्या आत शिरतात. हा प्रकार रेल्वे स्थानकात दररोज पाहायला मिळत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने नो-पार्किंगसंदर्भात ठोस कारवाई करणे आता आवश्यक झाले आहे. (प्रतिनिधी)