२०० जणांचे अस्थिकलश स्मशानातून कुणी नेईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 05:00 AM2020-09-21T05:00:00+5:302020-09-21T05:00:15+5:30

हिंदू स्मशान संस्थाद्वारे संचालित स्मशानभूमीत दररोज २० ते २५ अंत्यसंस्कार केले जातात. त्यामध्ये १०-१२ कोरोनाग्रस्त असल्याची नोंद आहे. त्यांचे अस्थिकलश त्याच दोन मजली इमारतीच्या वरच्या माळ्यावर अस्थी सुरक्षा कक्षात लॉकरमध्ये ठेवले जातात. एरवी या आजाराचे स्वरूप पाहता, बहुतांश प्रकरणांत नातेवाईक मंडळी अस्थी ताब्यात घेण्यास टाळाटाळ करीत असल्याने लॉकर फुल्ल झाले आहेत.

No one took the remains of 200 people from the cemetery | २०० जणांचे अस्थिकलश स्मशानातून कुणी नेईना

२०० जणांचे अस्थिकलश स्मशानातून कुणी नेईना

Next

मनीष कहाते ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्थानिक हिंदू स्मशान भूमीच्या लॉकरमध्ये कोरोनाग्रस्तांसह इतरांच्याही अस्थी आप्तांच्या प्रतीक्षेत आहेत. लॉकडाऊन, संचारबंदी, वाहनबंदी यामुळे विद्युत दाहिनीतून निघालेल्या राखेचे विसर्जन पार पडलेले नाही. असे २०० अस्थिकलश सील अवस्थेत पडून आहेत.
हिंदू स्मशान संस्थाद्वारे संचालित स्मशानभूमीत दररोज २० ते २५ अंत्यसंस्कार केले जातात. त्यामध्ये १०-१२ कोरोनाग्रस्त असल्याची नोंद आहे. त्यांचे अस्थिकलश त्याच दोन मजली इमारतीच्या वरच्या माळ्यावर अस्थी सुरक्षा कक्षात लॉकरमध्ये ठेवले जातात. एरवी या आजाराचे स्वरूप पाहता, बहुतांश प्रकरणांत नातेवाईक मंडळी अस्थी ताब्यात घेण्यास टाळाटाळ करीत असल्याने लॉकर फुल्ल झाले आहेत. सन १९४४ मध्ये या स्मशानभूमीची निर्मिती झाली. सर्वात स्वच्छ, सर्व सोयीसुविधायुक्त म्हणून तिचा लौकिक आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश नागरिकांचा अंत्यविधी येथे होते.
अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर अस्थी कलशरूपाने ठेवण्यासाठी येथे छोटेखानी लॉकरची सुविधा आहे. गेल्या जानेवारी महिन्यापासून संपूर्ण लॉकर अस्थिकलशांनी भरले आहेत. त्यापैकी पाच ते सहा अस्थिकलश नेण्याची जाणीवच सुमारे सहा ते सात वर्षांपासून आप्तांना नाही. संस्थेने संबंधित नातेवाइकांना अनेक वेळा अस्थी घेऊन जाण्याच्या सूचना दिल्या. परंतु, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आजपर्यंत मिळाला नाही.
याप्रकरणी अधिक माहिती घेतली असता सूत्राने सांगितले की, काही लोक हलाखीच्या स्थितीत आहेत., तर काहींजवळ वाहतुकीचे कोणतेही साधन नाही. अनेक जणांची इच्छा ही अस्थींचे विसर्जन त्र्यंबकेश्वर, काशी, कौंडण्यपूर, गंगासागर आदी ठिकाणी करण्याची असते. परंतु, कोरोनाकाळात वाहतुकीची साधने उपलब्ध नाहीत. म्हणून येथून अस्थी नेण्याबाबत ते उत्सुक नाहीत.
कोरोनाग्रस्तांच्याही अस्थी लाल रंगाचे छोटेखानी मडक्यात लॉकरमध्ये ठेवल्या आहेत. विविध धार्मिक परंपरेनुसार लाल कापडात तसेच विविध भाड्यांमध्ये मृतांचे अवशेष ठेवले आहेत. कालौघात किल्ल्या हरविल्यामुळे लॉकरला कागदाचे सील लावले आहेत.
स्मशान संस्था सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहते. कोरोनाने मृत्यू पावलेले रुग्ण स्मशानभूमीच्या मागील बाजूच्या दारातून आणले जातात. त्यांचे पार्थिव अग्नी देण्याऐवजी विद्युत दाहिनीच्या सुपूर्द केले जाते. त्याची मूल्य १५०० रूपये आहे. लाकूड, तुºहाट्या, गोवऱ्या याद्वारे पारंपरिक अग्निसंस्काराकरिता संस्था २७०० रुपये आकारते. दोन विद्युत दाहिन्यांपैकी तांत्रिक कारणामुळे एक बंद आहे. पुणे येथील तंत्रज्ञ ती दुरुस्त करणार आहे.
कोरोनाग्रस्ताच्या अंत्यसंस्काराच्या वेळी स्मशानभूमीत येणारे नातेवाईक मुख्य दाराजवळच थांबतात. विद्युत दाहिनीच्या परिसरात त्यांना प्रवेश नाही. त्यांचे पार्थिव वाहून आणण्यासाठी एक शववाहिका आरक्षित ठेवण्यात आली आहे.

अस्थि कलशचे संपूर्ण लॉकर फुल्ल आहेत. त्यामुळे १०० नवीन लॉकरची आॅर्डर देण्यात आली आहे. अस्थि घेऊन जाण्याकरिता नातेवाइकांना फोन करणे सुरू आहे.
- एकनाथ इंगळे, मॅनेजर, हिंदू स्मशान संस्था, अमरावती.

Web Title: No one took the remains of 200 people from the cemetery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.