वाढत्या कोरोनाचे कुणालाही नाही गांभीर्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:12 IST2021-04-11T04:12:50+5:302021-04-11T04:12:50+5:30
प्रशांत काळबेंडे जरूड : मार्च, एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यात वाढलेली कोरोना रुग्णांचा संख्या बघता स्थानिक तहसीलदार किशोर गावंडे ...

वाढत्या कोरोनाचे कुणालाही नाही गांभीर्य
प्रशांत काळबेंडे
जरूड : मार्च, एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यात वाढलेली कोरोना रुग्णांचा संख्या बघता स्थानिक तहसीलदार किशोर गावंडे आणि पोलीस निरीक्षक यांनी वरूड तालुका वाऱ्यावर सोडल्याचे दिसून येत आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी कोणतेही प्रयत्न महसूल आणि पोलीस प्रशासन करताना दिसून येत नाही. यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. १०० खाटांचे शासकीय कोविड सेंटर वरूडमध्ये सुरू करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
तत्कालीन ठाणेदार मगन मेहते आणि तहसीलदार सुनील सावंत हे नागरिकांना कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत होते. त्यांची जाणीव आणि आठवण तालुक्यातील नागरिकांना प्रकर्षाने जाणवते. प्रशासनाचे नेतृत्व बदलले की, निर्णयातील गतिमानता नष्ट होईल, हे कुणाच्याही ध्यानीमनी नव्हते. ग्रामीण भागात नागरिकांच्या झुंडीच्या झुंडी कोरोना संक्रमित होत असूनही कुणालाही कोरोनाचे गांभीर्य नाही. पूर्ववत झालेले ग्रामीण जीवन पाहून ग्रामीण भागातील कोरोनाची भीती संपली असून, ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामस्थांना अटकाव करणारेही कुणी उरलेले नाही.
अशी आहे परिस्थिती
तालुक्यात आजपर्यंत कोरोना चाचणी केलेल्या व चाचणी न केलेल्या १०० च्या वर संशियातांचा मृत्यू झाला. मृत्यूपासून तेराव्यापर्यंतचे सर्व सोपस्कार साधारणत: ३०० ते ४०० लोकांच्या उपस्थितीत करण्यात आले. अनेक जण तोंडाला मास्क न लावता फिरत असून, आता कोरोना लस आल्याने भीती कशाची, अशा नागरिकांच्या भावना आहेत. शासनाचा कोणताही निर्बंध वरूड तालुक्यात दिसून येत नाही. जीवनावश्यक वस्तूंच्या नावाखाली बाजारपेठ खुलेआम सुरू आहे.