कर्जवाटपास बँकांची ना

By Admin | Updated: July 7, 2017 00:15 IST2017-07-07T00:15:12+5:302017-07-07T00:15:12+5:30

अडचणीतील शेतकऱ्यांना अर्थसहाय्य व्हावे, यासाठी शासन हमीवर शेतकऱ्यांना तातडीने १० हजाराचे कर्जवाटप करण्याचे

No loan | कर्जवाटपास बँकांची ना

कर्जवाटपास बँकांची ना

तातडीचे १० हजाराचे कर्ज : तीन लाख शेतकऱ्यांसमोर नवे संकट
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अडचणीतील शेतकऱ्यांना अर्थसहाय्य व्हावे, यासाठी शासन हमीवर शेतकऱ्यांना तातडीने १० हजाराचे कर्जवाटप करण्याचे निर्देश यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी १ जुलै रोजी बँकर्सची बैठक घेऊन पुन्हा बँकाना निक्षून बजावले. मात्र, जिल्ह्यातील एकाही बँकेने शेतकऱ्यांना कर्ज दिले नसल्याने बँका शासन व प्रशासनाला जुमानत नाही, हे पुन्हा सिद्ध झाले आहे. त्यामुळे यंदाच्या खरिपात शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.
शासनाने कर्जमाफी केली असली तरी शेतकरी थकबाकीदार असल्याने बँकांच्या धोरणानुसार त्यांना कर्ज मिळू शकत नाही. म्हणून अशा शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामात अर्थसहाय्य मिळावे, यासाठी ३० जून २०१२ पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांना १० हजाराच्या मर्यादेत शासनहमीवर तातडीचे कर्ज देण्याचे निर्देश १४ जून रोजी शासनाने दिले. जाहीर निकषात काही सुधारणा करून २० जून रोजी सुधारित आदेश दिलेत. याविषयीचे आदेश सर्व बँकांना देण्यात आले. मात्र, एकाही बँकेने एकाही शेतकऱ्याला तातडीचे १० हजाराचे कर्ज दिलेले नाही. बँका जुमानत नसल्याने पालकमंत्र्याच्या निर्देशाने जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी जिल्ह्यातील खरीप पीककर्ज वाटप व तातडीचे १० हजाराच्या कर्जवाटपाचा आढावा घेण्यासाठी १ जून रोजी सभा आयोजित केली होती.

एसएलबीसीचे निर्देश नाहीत
४तातडीच्या कर्जवाटपाचे शासनादेश असले तरी राष्ट्रीयीकृत बँकांना राज्यस्तरीय बँकर्स समितीचे (एसएलबीसी) निर्देश नाहीत. यासंदर्भात आरबीआयसोबत संपर्क सुरू असला तरी अद्याप बँकांना सूचना नसल्यामुळे याबँकानी कर्जवाटप सुरू केलेले नाही. जिल्हा बँकेद्वारा शिखर बँकेकडे कर्जाची मागणी करण्यात आली आहे. मात्र, व्याज दर ८.७५ टक्के असल्यामुळे प्रस्ताव रखडला असल्याने तातडीचे कर्जवाटप शेतकऱ्यांना करण्यात आलेले नाही.

तीन लाख शेतकऱ्यांना मिळू शकतो लाभ
४जिल्ह्यात तातडीच्या कर्जासाठी किमान तीन लाख शेतकरी पात्र आहेत. यामध्ये १ लाख ६७ हजार थकबाकीदार, एक लाख सहा हजार नवे खातेदार तर ४३ हजार शेतकऱ्यांनी नियमित कर्जाचा भरणा केल्याने ते देखील १० हजारांच्या कर्जास पात्र ठरले आहेत. यापैकी एकाही शेतकऱ्याला बँकेने कर्ज दिले नाही.

कर्जमाफीची व्याप्ती वाढली, दीड लाख शेतकरी पात्र
अमरावती : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची व्याप्ती शासनाने आता २००९ ते २०१६ अशी वाढविल्याने जिल्ह्यातील एक लाख ६७ हजार थकबाकीदार शेतकरी यामध्ये समाविष्ट झाले आहेत. मात्र, शासनाच्या निकषांनुसार यातील किमान दीड लाख शेतकरी पात्र ठरण्याची शक्यता आहे.
शासनाने २८ जूनच्या निर्णयाप्रमाणे एप्रिल २०१२ ते ३० जून २०१६ कालावधीत थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाखांच्या मर्यादेत कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यामध्ये सुधारणा करून व्याप्ती वाढविण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. यामध्ये जिल्हा सहकारी बँकेचे ३५ हजार ८३३ शेतकरी, राष्ट्रीयीकृत बँकेचे एक लाख ३१ हजार ९१ तर ग्रामीण बँकेचे ५०२, अशा एकूण एक लाख ६७ हजार थकबाकीदार शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

तातडीच्या कर्जवाटपासंर्दभात आरबीआयकडून अद्याप कुठलेच निर्देश नसल्याने कर्जवाटप करण्यात आलेले नाही. कर्जवाटपासाठी प्रशासनाचा वाढता दबाव असल्याने कळविले आहे.सूचनेची प्रतीक्षा आहे.
- जितेंद्र झा, व्यवस्थापक, अग्रणी बँक

तातडीच्या कर्जवाटपासाठी जिल्हा बँकेला पत्र देण्यात आले. प्रत्यक्ष बोलून सूचना देण्यात आल्यात. अद्याप शेतकऱ्यांना कर्जवाटप सुरू झाले नाही. लवकरच कर्जवाटप सुरू करण्यात येईल
- गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक

Web Title: No loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.