फायर ऑडिट नाही, मॉलच्या संचालकाविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:12 IST2021-01-15T04:12:23+5:302021-01-15T04:12:23+5:30
अमरावती : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील घटनेच्या पार्श्वभूमीवर महानगरातील शॉपिंग मॉलचे फायर ऑडिट तातडीने करावे. ऑडिट नसल्यास मॉल (आस्थापना) ...

फायर ऑडिट नाही, मॉलच्या संचालकाविरुद्ध गुन्हा
अमरावती : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील घटनेच्या पार्श्वभूमीवर महानगरातील शॉपिंग मॉलचे फायर ऑडिट तातडीने करावे. ऑडिट नसल्यास मॉल (आस्थापना) बंद ठेवावे, असे निर्देश पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी दोन दिवसांपूर्वी दिले होते. बडनेरा मार्गावरील एका मॉलचे ऑडिट झाले नसताना ते सुरू होते. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी मॉलचे संचालक, व्यवस्थापकाविरुद्ध गुरुवारी गुन्हे नोंदविले.
पोलीससूत्रानुसार, मॉलचे संचालक राज पनपालीया, व्यवस्थापक आशिष पुंडलिक गुल्हाने यांच्याविरुद्ध भादंविचे कलम १८८, सहकलम ३,३६ महाराष्ट्र आग प्रतिबंधक अधिनियम, जीवरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. फायर ऑडिट नसतानाही आस्थापना सुरू ठेवली. ग्राहकांची गर्दी जमविली. त्यामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला. याप्रकरणी राजापेठ ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके, पीएसआय किसन मापारी व पथकाने मॉलची तपासणी केली. यावेळी फायर ऑडिट संदर्भात कुठलेही कागदपत्र आढळून आले नाही. त्यामुळे पोलिसांच्यावतीने फिर्यादी पीएसआय किसन मापारी यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला व मॉल बंद करण्यात आले. भंडारा येथील दुर्देवी घटनेनंतर मॉल संचालकाविरुद्ध ही पहिलीची कारवाई ठरली आहे.