निर्जंतुकीकरण नाहीच
By Admin | Updated: June 5, 2017 00:02 IST2017-06-05T00:02:49+5:302017-06-05T00:02:49+5:30
स्थानिक पीडीएमसीमधील एनआयसीयूमध्ये चार नवजातांचा एकापाठोपाठ एक मृत्यू झाल्यानंतर अख्खा जिल्हा हादरला.

निर्जंतुकीकरण नाहीच
नवजात मृत्यूप्रकरण : डॉ.राजेंद्र निस्तानेंना पाठीशी घालण्याचा प्रयत्न ?
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्थानिक पीडीएमसीमधील एनआयसीयूमध्ये चार नवजातांचा एकापाठोपाठ एक मृत्यू झाल्यानंतर अख्खा जिल्हा हादरला. घटनेनंतर एनआयसीयूची तपासणी केली असता तेथे जंतूंचा प्रादुर्भाव असल्याची बाब समोर आली होती. मात्र, यानंतरही एनआयसीयूचे निर्जंतुकीकरण करण्यात आलेले नाही. पीडीएमसी व्यवस्थापनाला आणखी बाळांचा जीव जाण्याची प्रतीक्षा तर नाही ना, असा प्रश्न यामुळे उपस्थित केला जात आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय रूग्णालयातील (पीडीएमसी) नवजात शिशू-बालक अतिदक्षता कक्षातील चार बाळांचा एकापाठोपाठ एक मृत्यू झाला. त्यापैकी चांदूरबाजार येथील आफरीन बानो यांचे बाळ ‘सेप्टिसिमिया’ने दगावल्याची बाब पीडीएमसीचे डीन राजेंद्र जाणे यांनी स्पष्ट केली होती. जिल्हा शल्य चिकित्सक अरूण राऊत यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालात पीडीएमसीच्या एनआयसीयूमध्ये "स्टॅफिलोकॉकस आॅरिअस" जंतू आढळल्याचा स्पष्ट उल्लेख आहे.
या जंतूमुळे "सेप्टिसिमिया" बळावतो, असेही सीएस राऊत यांनीच स्पष्ट केले होते. यापार्श्वभूमिवर आफरीन बानो यांच्या बाळाला सेप्टिसिमियाची लागण एनआयसीयूतच झाली का, हा प्रश्न उपस्थित होतो. असे असेल तर हा देखील पीडीएमसी प्रशासनाचा हलगर्जीपणाच म्हणावा लागेल. मात्र, केवळ ‘सेप्टिसिमिया’आजाराची बाधा हेच आफरीन बानो यांचे बाळ दगावण्याचे कारण नाही तर त्या बाळावरही चुकीचे औषधोपचार झाल्याची बाब पुढे येत आहे.
मात्र, हलगर्जीपणाचा कळस गाठणारा हा प्रकार अद्यापही संपलेला नाही. चार बाळांच्या मृत्युला आठवडा उलटला असला तरी पीडीएमसीमार्फत अद्याप एनआयसीयूचे निर्जंतुकीकरण करण्यात आले नाही.
चार शिशुंच्या मृत्यूपूर्वी सूक्ष्मजीवशास्त्र विभागाने एनआयसीयूची तपासणी करून त्या ठिकाणी "स्टॅफिलोकॉकस आॅरिअस" जंतुचा प्रादुर्भाव असल्याचे स्पष्ट केले होते. संबंधित विभागाने याबाबत बालरोग विभागाला १३ वेळा पत्र देऊन एनआयसीयूचे निर्जंतुकीकरण करण्यास सूचविले होते. मात्र, त्यावेळी निर्जंतुकीकरण झाले नाही. कहर म्हणजे चार बाळांचे जीव गेल्यानंतरही एनआयसीयूचे निर्जंतुकीकरण करण्याची बाब पीडीएमसी प्रशासन गांभीर्याने घेत नाही. पीडीएमसीमध्ये उपचारार्थ येणाऱ्या जिल्ह्यातील गोरगरिब जनतेच्या जीवाशी चाललेला हा खेळ कधी संपणार, असा सवाल उपस्थित होत आहे. सद्यस्थितीत या कक्षात काही शिशू औषधोपचार घेत असून या घटनेची पुनरावृत्ती झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल नागरिकांद्वारे उपस्थित होत आहे.
डॉ. राजेंद्र निस्तानेवर कारवाई का नाही ?
बालरोगतज्ज्ञ डॉ.राजेंद्र निस्ताने हे बालरोग विभागाचे प्रमुख असल्यामुळे त्यांच्याकडे एनआयसीयूची सर्वस्वी जबाबदारी होती. रविवारी रात्री १२ ते सकाळी ८ वाजेपर्यंत त्यांची ड्युटी होती. तथापि चार नवजात शिशुंचा मृत्यू झाल्यानंतरही ते पीडीएमसीत आले नाहीत. उलटपक्षी ते अनधिकृतपद्धतीने रजेवर गेलेत. याप्रकरणी त्यांना पीडीएमसी प्रशासनाने निलंबित केले असून त्यांना मुुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. मात्र, आठवडाभरापासून निस्ताने हे ‘नॉटरिचेबल’ असल्याची माहिती डीन दिलीप जाणे यांनी दिली. सूत्रांनुसार, निस्ताने हे परदेशी गेल्याची माहिती आहे. डॉ.भूषण कट्टा आणि परिचारिका विद्या थोरात या दोघांविरुद्ध फौजदारी गुन्हे नोंदविण्यात आलेत. मात्र, डॉ.राजेंद्र निस्ताने यांचेविरुद्ध कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे श्री शिवाजी शिक्षण संस्था निस्तानेंना पाठीशी घालत असल्याचा आरोप होत आहे.
हे तर कायद्याचे उल्लंघनच
आफरीन बानो हिच्या मृत बाळाचे दफन केलेले पार्थिव बाहेर काढून शवविच्छेदन करण्यास अचलपूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. तथापि कब्रस्थान समिती व आफरीन बानोच्या कुंटुंबियांनी पुरलेले शव बाहेर काढण्यास नकार दिल्याने गाडगेनगर पोलिसांनी ही प्रक्रिया तुर्तास थांबविली आहे. कायद्यामध्ये मृत्युचे कारण जाणून घेण्यासाठी अंत्यसंस्कारानंतर शवविच्छेदनाची तरतूद असताना कुटुंबियांच्या नकाराचे कारण पुढे करीत गाडगेनगर पोलिसांनी याबाबत मौन बाळगले आहे.त्यामुळे हे कायद्याचे उल्लंघन आहे. पोलीस विभागच कायद्याचे उल्लंघन करीत असेल तर सामान्यांचे काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. मृत्युचे कारण जाणून घेण्यासाठी अनेकदा पुरलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन केल्याची अनेक प्रकरणे यापूर्वी देखील जिल्ह्यात घडली आहेत, हे विशेष.