कला, क्रीडा शिक्षक नियुक्तीकरिता नितीन गडकरी यांना साकडे
By Admin | Updated: January 5, 2016 00:06 IST2016-01-05T00:06:31+5:302016-01-05T00:06:31+5:30
केंद्र सरकारने ६ ते १४ वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणारा अधिनियम २००९ पारित करून...

कला, क्रीडा शिक्षक नियुक्तीकरिता नितीन गडकरी यांना साकडे
निवेदन सादर : विदर्भ कला शिक्षक संघ
अमरावती : केंद्र सरकारने ६ ते १४ वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणारा अधिनियम २००९ पारित करून या कायद्याची अंमलबजावणी जम्मू-काश्मीर वगळता संपूर्ण भारतात १ एप्रिल २०१० पासून सुरू केली आहे. या कायद्याची जशीच्या तशी अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने केल्यामुळे राज्यात शालेय स्तरावर भविष्यात कला, क्रीडा शिक्षकांची कायमपदी नियुक्ती होऊ शकणार नाही, यासाठी विदर्भ कला संघटनेव्दारा ना. नितीन गडकरी यांना साकडे घालण्यात आले.
केंद्र शासनाने आर.टी.ई अॅक्ट २००९ मधील कलम १९ ते २५ मध्ये कला, क्रीडा, कार्यानुभव या शिक्षकांचे पदाची अंशकालीन नेमणुकांबाबत तरतूद केली आहे. त्यामुळे या कायद्यातील तरतुदीनुसार कला, क्रीडा, शिक्षकांची कायम पदाऐवजी अंशकालीन निर्देशक होणार असल्याने राज्यातील शालेय स्तरावर यापुढे कायम कला, क्रीडा शिक्षक उपलब्ध होऊ शकणार नाही. या अनुषंगाने विदर्भ कला शिक्षक संघाचे अध्यक्ष विनोद इंगोले, कार्यवाहक गणेश भुतडा, गजानन भोरळ आदींनी ना. नितीन गडकरी यांची भेट घेऊन निवेदन दिले. (प्रतिनिधी)