नऊ लाखांचे दागिने पळविले
By Admin | Updated: October 18, 2014 22:56 IST2014-10-18T22:56:23+5:302014-10-18T22:56:23+5:30
भारतीय स्टेट बँकेच्या स्थानिक राठीनगर परिसरातील शाखेसमोर एका निवृत्त बँक व्यवस्थापकाजवळील नऊ लाख रुपये किमतीचे दागिने पळविल्याची घटना शनिवारी सकाळी ९.३० वाजता दरम्यान घडली.

नऊ लाखांचे दागिने पळविले
राठीनगरातील घटना : निवृत्त बँक व्यवस्थापकाला मोठा गंडा
अमरावती : भारतीय स्टेट बँकेच्या स्थानिक राठीनगर परिसरातील शाखेसमोर एका निवृत्त बँक व्यवस्थापकाजवळील नऊ लाख रुपये किमतीचे दागिने पळविल्याची घटना शनिवारी सकाळी ९.३० वाजता दरम्यान घडली. बाळासाहेब शंकर वैद्य असे फसवणूक झालेल्या निवृत्त बँक व्यवस्थापकाचे नाव आहे. त्यांनी दिवाळीनिमित्त पूजेत ठेवण्यासाठी बँकेच्या लॉकरमधून दागिने काढले होते.
पंचवटी कॉलनी येथील रहिवासी बाळासाहेब वैद्य यांच्या नातूचा वाढदिवस रविवारी आहे. तसेच दिवाळी सण तोंडावर आल्याने लॉकरमधून दागिने काढण्यासाठी बाळासाहेब वैद्य राठीनगरातील स्टेट बँक आॅफ इंडिया येथे शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास एमएच २७- एबी- ३३३१ या दुचाकी वाहनाने गेले होते. त्यांनी बँकेत जाऊन लॉकरमधून ३०० गॅ्रम व १५० ग्रॅमचे अशा दोन डब्यांमध्ये असलेले सोन्याचे दागिने काढले. बँकेतून सोन्याच्या दागिन्याचे दोन डबे पिशवीत टाकून ते त्यांच्या दुचाकीजवळ आले असता दुचाकी पंक्चर असल्याचे आढळले. बँकेबाहेरच पंक्चर दुरुस्तीचे दुकान होते. परंतु पंक्चर दुरुस्त करणारा कारागीर नव्हता. त्यामुळे बाळासाहेबांनी बँकेजवळील पानटपरी चालक राजू सोनोने याला विचारुन त्यांची दुचाकी पानटपरीजवळील रिकाम्या जागेत ठेवली. गाडी पंक्चर असल्यामुळे काही वेळ घालविण्याकरिता ते आॅटोने सांस्कृतिक भवननजीकच्या एका कार्यालयात गेले. तेथून काही वेळानेते पुन्हा दुचाकी घेण्याकरिता परत आले. दोन अज्ञात युवक बाळासाहेबांजवळ आले आणि त्यांच्या कपड्यांवर घाण पडल्याचे सांगितले.
पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल
राठीनगरातील स्टेट बँक आॅफ इंडियासमोर निवृत्त बँक व्यवस्थापकाची फसवणूक झाल्याची माहिती पोलीस विभागाला मिळताच गाडगेनगर पोलीस व गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. एसीपी तळवी यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम, पीएसआय नितीन थोरात, एपीआय राठोड, राजेश राठोड, संजय बाळापुरे, चैतन्य रोकडे, महेंद्र गावंडे, तसेच गाडगेनगरचे पीएसआय पवार, पाली यांच्यासह चार्ली कमांडो यांनी घटनास्थळी पाहणी करुन घटनेची चौकशी केली.