विजेच्या धक्क्याने नऊ बकऱ्या दगावल्या
By Admin | Updated: June 24, 2015 00:43 IST2015-06-24T00:43:44+5:302015-06-24T00:43:44+5:30
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार परत एकदा चव्हाट्यावर आला.

विजेच्या धक्क्याने नऊ बकऱ्या दगावल्या
तिवसा येथील घटना : वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
तिवसा : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार परत एकदा चव्हाट्यावर आला. बकऱ्यांचा कळप चराई करण्याकरिता गेलेल्या ९ बकऱ्यांचा जमिनीवर पडलेल्या जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ९.३० वाजता तिवसा येथील टोल नाक्यानजीक शेतशिवारात घडली.
दीपक एकनाथ सावंत (२५ रा. तिवसा) हा गुराखी आपल्या मालकीच्या बकऱ्या चराई करण्याकरिता घेऊन गेला होता. त्यापैकी दोन बकऱ्या फुलाबाई सावंत या महिलेच्या होत्या.
सदर बकऱ्यांचा कळप अमरावती-नागपूर महामार्गावरील मुख्य तिवसा टोल नाक्यानजीक डाव्या बाजूला एका शेतात गेल्या असता तेथे जिवंत वीज तारा जमिनीवर पडल्या होत्या. या विद्युत तारेला नऊ बकऱ्यांचा स्पर्श होताच त्यांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये सुदैवाने गुराखी मालक दीपक सावंत याचा जीव थोडक्यात बचावला.
बकऱ्यांचा मृत्यू झाल्याने सावंत याचे ५० हजारांचे नुकसान झाले असून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे सदर घटना घडली असल्याने नुकसानग्रस्त गुराखी दीपक सावंत याने तिवसा पोलीस ठाण्यात वीज वितरण कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल आहे. मंगळवारी भरदिवसा उघड्यावर जिवंत वीज तारा पडल्यामुळे बकऱ्यांचा मृत्यू झाल्याने सावंत यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.
त्यामुळे महावितरण कंपनीने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गुराखी दीपक सावंत याने तक्रारीत केली आहे. (प्रतिनिधी)