आरोग्य विभागातील नऊ कर्मचाऱ्यांची उचलबांगडी
By Admin | Updated: July 30, 2015 00:22 IST2015-07-30T00:22:12+5:302015-07-30T00:22:12+5:30
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात गेल्या १० वर्षापासून ठाण मांडून बसलेल्या नऊ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्त्या ...

आरोग्य विभागातील नऊ कर्मचाऱ्यांची उचलबांगडी
निर्णय : प्रतिनियुक्ती रद्द करून मूळ ठिकाणी रूजू
अमरावती : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात गेल्या १० वर्षापासून ठाण मांडून बसलेल्या नऊ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्त्या जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन भालेराव यांनी रद्द केल्या आहेत. कार्यमुक्त करण्यात आलेल्या उपरोक्त सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ नियुक्तीच्या ठिकाणी रवाना करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागात गट क (वर्ग ३) कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या धोरणाची अंमलबजावणी करताना अनियमितता झाल्याची तक्रार जिल्हा परिषद सदस्य उमेश केने यांनी सीईओ व उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती सतीश हाडोळे यांच्याकडे लेखी स्वरूपात ३ जून रोजी केली होती. यामध्ये आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या शासन निर्णयानुसार राबविताना याच शासन निर्णयान्वये मे २०१४ मध्ये बदलीत अनिममितता करण्यात आली होती. ती प्राधान्याने दूर करणे गरजेचे असताना तसे न करता २४ मे २०१५ रोजी सुध्दा फक्त दोन -तीन वर्षेच झालेल्या कर्मचाऱ्यांना प्रशासकीय बदलीने मेळघाटात पाठविण्यात आले होते. नियमबाह्य पध्दतीने मुख्यालयी प्रतिनियुक्तीवरील आरोग्य कर्मचाऱ्यांना पुन्हा जिल्हा मुख्यालयी कायम ठेवण्यात आले होते. त्यामुळे अशा सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्ती रद्द करण्याचा मुद्दा जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेतही गाजला होता. शेवटी जिल्हा आरोग्य अधिकारी भालेराव यांनी गेल्या दहा वर्षापासून प्रतिनियुक्तीवरील ९ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या. (प्रतिनिधी)