वाहन परवाना मिळविण्यासाठी नागरिकांना होतो रात्रीचा दिवस
By Admin | Updated: February 28, 2015 00:38 IST2015-02-28T00:38:21+5:302015-02-28T00:38:21+5:30
रस्त्यावर वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांना परवाना विचारला जातो. परवाना नसल्यास त्यांना दंड आकारला जातो. त्यामुळे परवाना काढायला गेल्यास रात्र जागून ....

वाहन परवाना मिळविण्यासाठी नागरिकांना होतो रात्रीचा दिवस
परतवाडा : रस्त्यावर वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांना परवाना विचारला जातो. परवाना नसल्यास त्यांना दंड आकारला जातो. त्यामुळे परवाना काढायला गेल्यास रात्र जागून रांगेत उभे राहावे लागत असताना परतवाडा येथील आरटीओ कॅम्पमध्ये दिले जाणाऱ्या परवान्याची संख्या वाढवून देणे आवश्यक आहे. तसेच कॅम्पचेही दिवस वाढविणे गरजेचे आहे जेणेकरून नागरिकांना सोयीचे होईल.
शासनाच्या नियम व कायद्याचे पालन व्हावे याकरिता नागरिक सकारात्मक पाऊल उचलत असताना अशा कार्यात प्रशासनाने याकरिता तातडीने कार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे. शासकीय योजना यशस्वी करणे आवश्यक असताना आरटीओ कॅम्पमध्ये वेगळे चित्र पहावयास मिळते.
अचलपूर तालुक्यातील अनेक वाहन चालक नियमांची पायमल्ली होऊ नये म्हणून वाहन चालविण्याकरिता आवश्यक असणारा परवाना काढण्याकरिता परतवाडा येथील विश्रामगृह येथे होणाऱ्या आरटीओ कॅॅम्पमध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात. परंतु आरटीओ विभागाने एका कॅम्पमध्ये केवळ १०० लर्निंग व ७० परमनंट असा आकडा निश्चित केला असल्याने यामध्ये आपला नंबर लागण्यासाठी अनेक नागरिक ठरलेल्या कॅम्पच्या आदल्याच दिवशी विश्रामगृहासमोरील मैदानात रात्र जागून काढताना दिसतात. शासन एकीकडे ई-प्रशासन ही संकल्पना राबवत असताना वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी नागरिकांना कशाप्रकारे त्रास सहन करावा लागतो या विश्रामगृहावर महिन्याच्या दहा आणि वीस तारखेला पाहायला मिळते.
या परवाना मिळविण्याकरिता होत असलेल्या त्रासाबद्दल उपस्थित असलेल्या सर्वच नागरिकांना संतप्त भावना व्यक्त करीत या कॅम्पमधील परवाना मर्यादा वाढवून देण्यात यावी अन्यथा कॅप रोज घेण्यात यावा, अशी मागणीदेखील केली आहे. यात ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांनी आपली रोजंदारी पाडून परवान्याकरिता उपस्थित राहावे लागते. एकीकडे नागरिक शासनाचे नियम पाळताना दिसत असताना मात्र शासन त्यांना वेठीस धरत असल्याचे चित्र आहे. या ठिकाणी अचलपूर तालुक्याची लोकसंख्या पाहता आरटीओ विभागाचे स्थायी स्वरुपात उपविभागाचे कार्यालय स्थापित करून सुविधा उपलब्ध करणे आवश्यक झाले आहे. (प्रतिनिधी)