युवकाने अडीच फुटाच्या पाइपमध्ये काढली रात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 23:08 IST2018-02-28T23:08:11+5:302018-02-28T23:08:11+5:30
नजीकच्या कांडली येथील रोशन मेहरे (३८) हा युवक सोमवारी रात्री कोर्ट रोड येथील नादुरुस्त पुलाजवळून जात होता.

युवकाने अडीच फुटाच्या पाइपमध्ये काढली रात्र
आॅनलाईन लोकमत
परतवाडा : नजीकच्या कांडली येथील रोशन मेहरे (३८) हा युवक सोमवारी रात्री कोर्ट रोड येथील नादुरुस्त पुलाजवळून जात होता. अचानक पाय घसरल्याने थेट नादुरुस्त पुलाखाली अडीच फुटाच्या लोखंडी पाइपमध्ये जाऊन अडकला. रात्रभर तो त्यामध्येच होता. मंगळवारी सकाळी त्याला महत्प्रयासाने बाहेर काढले.
रोशन मेहरे हा रात्रभर लोखंडी पाइपमध्ये तडपडत राहिला. मंगळवारी सकाळी ९.३० दरम्यान संजय तिवारी नामक व्यक्तीला पुलाखाली कोणीतरी विव्हळत असल्याचे जाणवले. एक युवक पाइपमध्ये अडकल्याचे लक्षात आले. त्यांनी सामाजिक कार्यकर्ते रूपेश लहाने यांच्याशी संपर्क साधला. दोघांनी घटनास्थळावरून सर्पमित्र सुरमा भोपाली यांना बोलावून युवकाला सुखरूप बाहेर काढले. थोडा वेळ अधिक झाला असता, तर या युवकाचा गुदमरून मृत्यू झाला असता. सदर नादुरुस्त पुलाच्या ठिकाणी ठेकेदारांनी सुरक्षा व्यवस्था केली नसल्याने संताप व्यक्त होत आहे.