तलावातील गाळ काढण्याच्या कामाला कंत्राटदाराकडून बगल
By Admin | Updated: May 25, 2016 00:44 IST2016-05-25T00:44:05+5:302016-05-25T00:44:05+5:30
टंचाईग्रसत तारुबांदा या गावातील एकमेव तलावाचे गाळ काढून खोलीकरणाचे काम प्रस्तावित असताना कंत्राटदाराने

तलावातील गाळ काढण्याच्या कामाला कंत्राटदाराकडून बगल
टंचाईग्रस्त तारुबांदा : व्याघ्र जंगलात खोदकाम
धारणी : टंचाईग्रसत तारुबांदा या गावातील एकमेव तलावाचे गाळ काढून खोलीकरणाचे काम प्रस्तावित असताना कंत्राटदाराने लगतच्या व्याघ्र प्रकल्पातील जंगालतून मुरूम खोदण्याचे अफालतून प्रकार सुरू केल्याने मूळ उद्देशाला बगल देण्यात आले आहे. त्यामुळे या कामावर होणारे २५ कोटी रुपयांचे खर्च पाण्यात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
धारणीपासून ४० किमी अंतरावरील चिखलदरा तालुक्यातील तारुबांदा हे गाव आहे. या गावात उन्हाळ्यात दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होत असल्याने ४ महिने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. यावर्षीसुद्धा टँकरद्वारे एकमात्र विहिरीत पाणी सोडण्यात येत असून नंतर दोरीने पाणी काढण्याचे प्रकार सुरू आहे. त्यामुळे एकाच विहिरीवर संपूर्ण गावाची तहान भागविली जात आहे.
या नेहमीच्या त्रासापासून मुक्ती मिळावी म्हणून विहिरीच्या दक्षिणेला असलेल्या तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय जि.प.सदस्य महेंद्र सिंह गैलवार यांनी घेतला. त्यांनी महात्मा फुले योजनेत या तलावाचे खोलीकरण व गाळ उपसण्याचे कामाला मंजुरी मिळवून दिली. त्यानुसार कामाची निविदाही काढण्यात आली. कंत्राटदाराने प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली. मात्र गाळ उपसण्याचे सोडून लगतच्या भूभागातून मुरूम खोदण्याचे काम सुरू केले. या प्रकाराला तारुबांदा व्याघ्र प्रकल्पाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सौदागर यांनी त्वरित बंदी आणली व कामात होत असलेला गैरप्रकार थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही न जुमानता जेसीबीच्या सहाय्याने मुरूम खोदण्याचे काम सुरूच होते. याचे सविस्तर वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित केले होते. गावकऱ्यांनीसुद्धा गाळ काढण्याचा आग्रह धरला. गाळ काढण्यात जास्त परिश्रम लागत असल्याने कंत्राटदाराने कामच बंद केल्याचे आज प्रस्तुत प्रतिनिधीने भेट दिली असता निदर्शनास आले आहे. गाव तलावातील प्राणी उपासण्याचे काम गावकऱ्यांनी स्वत:कडील ५-६ आॅईल इंजीन लावून केले. मात्र गाळ काढण्याचे वेळी कंत्राटदाराने काम बंद करुन दिले. याबाबत गावकऱ्यांनी संवाद साधला असता कंत्राटदाराकडून डिझेल संपले, जेसीबी खराब झाले, असे उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे. त्यामुळे तारुबांदा गावकऱ्यांची पाण्याची समस्या कायमस्वरुपी दूर होण्याचे स्वप्न पूर्ण होण्याची आशा मावळली आहे. (तालुका प्रतिनिधी)
गावतलाव हे तारुबांदाची तहान व इतर गरजा मागविण्याचे महत्त्वाचे स्त्रोत्र आहे. या तलावातील गाळ काढून खोलीकरण झाल्यास येथील पाणी समस्या नेहमीसाठी दूर होईल. यासाठी गावकऱ्यांना कामाचे नियोजन निविदेप्रमाणे व अंदापत्रकानुसार करण्याची सूचना दिली आहे.
- सौदागर,
वन परिक्षेत्र अधिकारी, तारुबांदा
तारुबांदा हे गाव माझे मतदारसंघ चिखलीत येते. या गावताील पाण्याची समस्या कायमस्वरुपी दूर व्हावी, या हेतुने तलावाचे खोलीकरण करण्याचे कामाला मंजुरात आणून दिली. मात्र कंत्राटदाराच्या मनमानीमुळे गाळ उपसण्याचे काम बंद पडले आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
- महेंद्रसिंह गैलवार,
जि.प.सदस्य, चिखली सर्कल