नवजाताचा गाडलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी काढला बाहेर
By Admin | Updated: November 1, 2016 00:10 IST2016-11-01T00:10:41+5:302016-11-01T00:10:41+5:30
तीन दिवसांच्या नवजात अर्भकाचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदन न करताच अंत्यसंस्कार करण्यात आला.

नवजाताचा गाडलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी काढला बाहेर
हळहळ : सुनेच्या सासरच्यांनी हत्या केल्याचा आरोप
दर्यापूर : तीन दिवसांच्या नवजात अर्भकाचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदन न करताच अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यामुळे सुनेच्या सासरच्या मंडळींनी नवजात नातीची हत्या करून मृतदेह पुरल्याचा आरोप सासूने पोलिसात दिलेल्या तक्रारीत केला आहे.
आजीच्या तक्रारीवरून पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. ही घटना रविवारी म्हणजे दिवाळीच्या मध्यरात्री घडली. बाभळी येथील चंद्रभागेच्या पात्रातून नवजात अर्भकाचे पार्थिव सोमवारी सकाळी बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
पोलीस सुत्रानुसार, ऋषता हर्षल खंडारे (२३, रा. अमरावती) नामक महिलेला तिच्या माहेरी धामोडी येथे प्रसूतीकरीता आणण्यात आले होते. येथील उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी सकाळी तिला दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने तिला डफरीनला रेफर केले. रविवारी सकाळी ७ वाजता तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. प्र्रकृती चांगली असल्यामुळे तिला सुटी सुद्धा देण्यात आली.
बाळाला दाखल केले होते खासगी रुगणालयात
दर्यापूर : त्यामुळे ती नवजात बाळासह दर्यापूरला आली. मात्र, पुन्हा बाळाची प्रकृती बिघडल्याने त्याला खासगी रुग्णालयात उपचाराकरीता आणले. दुर्देवाने उपचारादरम्यान बाळ दगावल्याचे तिच्या माहेरच्या मंडळीची म्हणणे आहे.
परंतु हर्षल खंडारेची आई चंद्रकला खंडारे यांनी मुलाच्या सासरच्या मंडळींनी संगनमत करुन बाळाची हत्या केल्याचा व प्रकरण दडपण्यासाठी शवविच्छेदन न करताच अंत्यसंस्कार केल्याची तक्रार पोलिसांत दिल्याने या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे. पोलिसांनी हे प्रकरण तपासात घेतले आहे. चंद्रभागेच्या पात्रात अर्भकाला गाढल्याची तक्रार अर्भकाच्या आजीनेच दिल्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पुन्हा या अर्भकाला बाहेर काढले. या घटनेचा पुढील तपास दर्यापूरचे ठाणेदार नितीन गवारे करीत आहेत. (प्रतिनिधी)
अर्भकाची प्रकृती नाजूक व वजन कमी असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अमरावतीला नेण्याचा सल्ला नातेवाईकांना दिला होता. पण त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे उपचारादरम्यान ते अर्भक दगावले.
- डॉ. राजेंद्र भट्टड
संचालक, गोदावरी हॉस्पिटल दर्यापूर
अर्भकाच्या शवविच्छेदन अहवालानंतर नेमके मृत्युचे नेमके कारण समोर येईल. या अहवालानंतरच गुन्हा दाखल करण्यात येईल. तपास सुरु आहे.
- नितीन गवारे,
ठाणेदार, दर्यापूर