बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणाचा नव्याने प्रस्ताव
By Admin | Updated: June 23, 2014 23:38 IST2014-06-23T23:38:00+5:302014-06-23T23:38:00+5:30
अमरावती जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणाचा नव्याने प्रस्ताव तयार करण्याचा निर्णय महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने घेतला आहे.

बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणाचा नव्याने प्रस्ताव
गणेश वासनिक - अमरावती
अमरावती जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणाचा नव्याने प्रस्ताव तयार करण्याचा निर्णय महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने घेतला आहे. त्या अनुषंगाने विमानतळाची पाहणी करण्यासाठी प्राधिकरणाची चमू येत्या आठवड्यात दाखल होणार आहे. यापूर्वी तयार करण्यात आलेल्या विमानतळ विस्तारीकरण्याच्या प्रस्तावाला रद्द करण्यात आले आहे, हे विशेष.
राज्य शासनाने बेलोरा विमानतळाचा विकास व विस्तारीकरणाची जबाबदारी भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे सोपविली होती. त्यानुसार दिल्ली येथील विमानतळ प्राधिकरणाच्या चमुने काही महिन्यांपूर्वी बेलोरा विमानतळाची पाहणीसुध्दा केली. तीन सदस्यीय चमुने विमानतळाच्या विस्तारीकरणासंदर्भात अहवालसुध्दा दिला आहे. बेलोरा विमानतळाचा विकास आणि विस्तारीकरण शक्य असल्याचे या अहवालात नमूद आहे. मात्र कालांतराने राज्य शासनाने विमानतळाच्या विकासाचे धोरण बदलविल्याने याचा फटका बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणाला बसल्याची माहिती आहे. दरम्यान राज्य शासनाने बेलोरा विमानतळाच्या रन-वे दुरुस्ती व डागडूजीची प्रलंबित ठेवलेली फाईल त्वरेने मंजूर करुन येथे विमान लँडींगची होत असलेली गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेक वर्षांपासून विमानतळ विस्तारिकरणासाठी घेतलेल्या जमिनीचा कधी उपयोग होणार असा सवाल, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणाचा यापूर्वी २५० कोटी रूपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.
या प्रस्तावाला राज्य शासनाने मंजुरीसुध्दा दिली होती. मागील अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या विमानतळाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासित केले होते. मात्र विकासाचे धोरण बदलताच बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी नव्याने प्रस्ताव तयार करण्याचे ठरविण्यात आल्याने पुन्हा नवा प्रस्ताव, नव्या फाईली असा प्रवास सुरु होणार आहे. बेलोरा विमानतळाचा विकास व विस्तारीकरणाचा प्रस्ताव हा आता ३०० कोटींच्या वर जाईल, अशी माहिती आहे. मुंबई येथील महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे प्रबंधक वाला हे येत्या आठवड्यात बेलोरा विमानतळाची पाहणी करण्यासाठी येत आहेत. त्यांच्या सोबत चार ते पाच जणांची चमू येत असल्याची माहिती आहे. ही चमू बेलोरा विमानतळ हे पर्यावरण दृष्ट्या योग्य की अयोग्य? याची चाचपणी करणार आहेत.
विमानतळावर पाण्याची सोय, उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या, रन-वे, रस्ते, टर्मिनल इमारत, एटीएस इमारत, प्रकाश व्यवस्था आदींची पाहणी करुन शासनाला विस्तारीकरणाबाबतचा अहवाल सादर करणार आहे.