बेलोरा विमानतळाचा नव्याने होणार अभ्यास
By Admin | Updated: April 24, 2015 00:13 IST2015-04-24T00:13:27+5:302015-04-24T00:13:27+5:30
अमरावती शहर आणि विभागाच्या सर्वांगीण विकास साधण्याकरिता बडनेरानजीकच्या बेलोरा विमानतळाचा विकास करण्याच्या दृष्टीने ...

बेलोरा विमानतळाचा नव्याने होणार अभ्यास
अमरावती : अमरावती शहर आणि विभागाच्या सर्वांगीण विकास साधण्याकरिता बडनेरानजीकच्या बेलोरा विमानतळाचा विकास करण्याच्या दृष्टीने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरूवारी नवी दिल्ली येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
या बैठकीला केंद्रीय नागरी उड्डयन खात्याचे राज्यमंत्री महेश शर्मा, महाराष्ट्राचे उद्योग राज्यमंत्री, अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, जिल्हाधिकारी किरण गित्ते आणि अमरावती जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार उपस्थित होते. बेलोरा विमानतळाचा विस्तार करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही, हे भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे मत असले तरी अमरावती व पश्चिम विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी विस्तारीकरण करणे गरजेचे आहे आणि ते केले पाहिजे, असा आग्रह नितीन गडकरी यांनी बैठकीत केला.
त्यावर केंद्रीय राज्यमंत्री महेश शर्मा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व विमानतळाचा पुन्हा एकदा नव्याने अभ्यास करण्याचा निर्णय घेतला.