नववर्षात वीज दरवाढीचा‘शॉक’

By Admin | Updated: December 9, 2014 22:41 IST2014-12-09T22:41:39+5:302014-12-09T22:41:39+5:30

भाजप सरकारने वीज वितरण कंंपनीला देण्यात येणारे अनुदानच बंद केल्यामुळे जिल्ह्यातील ६ लाख १६ हजार ९४० वीज ग्राहकांना नववर्षात १५ ते २० टक्के दरवाढीचा ‘शॉक’ बसणार आहे. वीज कंपनीकडून लवकरच वाढीव

New year's power tariffs 'Shock' | नववर्षात वीज दरवाढीचा‘शॉक’

नववर्षात वीज दरवाढीचा‘शॉक’

सहा लाख ग्राहकांच्या खिशाला कात्री : जानेवारीपासूनच हाती येणार वाढीव वीज बिल
जितेंद्र दखने - अमरावती
भाजप सरकारने वीज वितरण कंंपनीला देण्यात येणारे अनुदानच बंद केल्यामुळे जिल्ह्यातील ६ लाख १६ हजार ९४० वीज ग्राहकांना नववर्षात १५ ते २० टक्के दरवाढीचा ‘शॉक’ बसणार आहे. वीज कंपनीकडून लवकरच वाढीव बिल नागरिकांच्या हाती दिले जाणार आहे.
शेतीपंपांना पुरविण्यात येणाऱ्या विजेच्या दरामध्ये वाढ न करण्याचा विचार शासकीय पातळीवर सुरू असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना या दरवाढीतून दिलासा मिळाला आहे. भाजप शासनाने पहिल्या झटक्यात वीज अनुदान बंद करुन वीज ग्राहकांना दरवाढीचा शॉक दिला आहे. त्यामुळे ‘अच्छे दिन’ येण्याच्या आशा सध्या तरी दिसत नाहीत.
जिल्ह्यात विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या वर्षभरात दर महिन्याला वीज बिल भरणे अनिवार्य करण्याचा नियम आणल्याने ग्राहकांकडील वीज थकबाकी कमी होण्यास मदत झाली आहे. वीज वितरण कंपनीकडून बिल न भरणाऱ्या ग्राहकांचे वीज कनेक्शन तातडीने तोडले जाते. कनेक्शन पुन्हा जोडण्यासाठी किचकट प्रक्रियेतून जावे लागत असल्याने ग्राहक बिल थकित ठेवत नाहीत. जिल्ह्यातील विजेची वाढती मागणी लक्षात घेता थकबाकीनुसार बी,सी,डी असे ग्रेड करुन सर्वाधिक थकबाकी असलेल्या तालुक्यांमध्ये भारनियमन केले जाते.
आता सबसिडी बंद झाल्याने जिल्ह्यातील ६ लाख १६ हजार ९४० वीज ग्राहकांना वीज दरवाढीचा फटका बसणे निश्चित आहे. शासकीय अनुदानातून वीज कंपनीला मिळणारी रक्कम आता ग्राहकांच्या खिशातून वीज वितरण कंपनी वसूल करणार आहे. त्यामुळे घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक ग्राहक, पाणी पुरवठा योजनेच्या ग्राहकांना मिळणाऱ्या वीज बिलात १५ ते २० टक्क्यांनी वाढ होणार आहे. ही दरवाढ साधारणपणे नव्या वर्षात लागू होऊ शकते. ग्रामीण व शहरी भागातील पाणीपुरवठा योजनांच्या बिलातही या निर्णयामुळे वाढ अपेक्षित आहे. एकूणच नववर्षात वीज व पाणी महागणार हे निश्चित आहे. दरम्यान महावितरण कंपनीने वीज नियामक आयोगाकडे वीज दरवाढीचा नवा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावावर निर्णय झाल्यास शेतीपंपांच्या बिलातही २० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात शेतीपंपाचे १ लाख ५६ हजार ९१ ग्राहक आहेत. त्यांना दरवाढीतून वगळण्याचा प्रयत्न सुरु आहे. लवकरच निर्णय अपेक्षित आहे.

Web Title: New year's power tariffs 'Shock'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.