नववर्षात मद्यपींचा चाकूहल्ला
By Admin | Updated: January 2, 2017 01:02 IST2017-01-02T01:02:55+5:302017-01-02T01:02:55+5:30
नववर्षांच्या स्वागतावेळी मद्यपी युवकांनी हॉटेल शालमध्ये धुमाकूळ घालून व्यवस्थापकासह वेटरवर प्राणघातक चाकूहल्ला केला.

नववर्षात मद्यपींचा चाकूहल्ला
हॉटेल शालमधील घटना : व्यवस्थापकासह वेटर गंभीर
अमरावती : नववर्षांच्या स्वागतावेळी मद्यपी युवकांनी हॉटेल शालमध्ये धुमाकूळ घालून व्यवस्थापकासह वेटरवर प्राणघातक चाकूहल्ला केला. व्यवस्थापक किशनसिंग गोवर्धनसिंग जाधव व वेटर सचिन सुरेश गाडे, असे जखमींची नावे आहे. या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी तीन आरोपींविरुध्द गुन्हा नोंदविला.
पोलीस सूत्रानुसार, स्वराज मनोज देशमुख (१९,रा.हर्षराज कॉलनी), निशांत अकुंश सावंत (१९,रा. प्रशांत नगर) व रोशन रमेश गाढे (२१,रा. कॉटन ग्रिन कॉलनी) अशी आरोपींची नावे आहे. नववर्षांच्या स्वागतासाठी रात्री उशिरापर्यंत हॉटेल व बार सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे शनिवारी मध्यरात्री शहरातील बहुतांश हॉटेल आणि बार सुरु होते. शनिवारी मध्यरात्री १२.४५ वाजतादरम्यान गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल शालमध्ये आरोपी युवक हे मद्य प्राशनासाठी गेले होते. त्यांनी काऊन्टरवर आरडाओरड केल्याने व्यवस्थापकांनी आरोपींना हटकले असता त्यांनी व्यवस्थापक किशनसिंग जाधव यांच्यावर चाकुने हल्ला केला. तेथील वेटर सचिन गाडे याने विरोध केला असता त्यांच्यावरही चाकूहल्ला चढविण्यात आला. या हल्ल्यात व्यवस्थापकासह वेटर सचिन गंभीर जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली. दोघांनाही इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले. वीरेंद्र भीमराव शहारे (रा.विलासनगर) यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०७, ३२४, ५०४, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला असून रविवारी तिघांना अटक केली.
गणेश कॉलनीत कार पेटली
अन्य एका घटनेत गणेश कॉलनीत उभ्या कारने पेट घेतल्याने खळबळ उडाली होती. आतषबाजीमुळे कारच्या टायरनी पेट घेतल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पाण्याचे बंब घटनास्थळी पोहोचून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.