प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी नवमतदार सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:22 IST2021-02-05T05:22:49+5:302021-02-05T05:22:49+5:30
धारणी नगरपंचायत : हॉटेल, धाब्यांवर मेजवानी श्यामकांत पाण्डेय धारणी : नगरपंचायतचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी, प्रचंड ...

प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी नवमतदार सरसावले
धारणी नगरपंचायत : हॉटेल, धाब्यांवर मेजवानी
श्यामकांत पाण्डेय
धारणी : नगरपंचायतचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी, प्रचंड थंडीच्या वातावरणातसुद्धा राजकीय वातावरण तापले आहे. नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गटा-तटातील नेत्यांनी प्रभागांमध्ये भेटीगाठी सुरू केल्या आहेत. प्रभागांमधील प्रभावशाली व्यक्तींना हॉटेल, धाब्यावर मेजवानी दिली जात आहे. नवख्या आणि नवउमेदवारांनी जनसंपर्क वाढविला आहे. त्यांनी प्रस्थापितांना धक्का देण्याची तयारी चालविली आहे.
पाच वर्षांपूर्वी धारणी ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर होऊन पहिली निवडणूक झाली. त्या पहिल्यावहिल्या सभागृहाचा कार्यकाळ नोव्हेंबर २०२० मध्ये संपुष्टात आला. कोरोनामुळे निवडणूक होऊ शकली नाही. मात्र आता ग्रामपंचायत निवडणूक झाल्याने राजकीय पातळीवर का होईना, नगरपंचायत निवडणुकीचे धुमशान सुरू झाले आहे. धारणी नगरपंचायतमध्ये एकूण १७ प्रभाग असून, सर्व प्रभागांमध्ये इच्छुकांनी जनसंपर्क चालविला आहे. काहींनी प्रभाग बदलून निवडणूक लढवण्याची तयारी चालविली आहे. कोणत्याही परिस्थितीत नगरसेवक म्हणून कायम राहावे यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आपलीच वर्णी लागावी, यासाठी प्रस्थापित उत्सुक आहेत. दुसरीकडे नवयुवक मंडळींनीदेखील प्रयत्न चालविले आहेत. आतापासून त्यांनी घरोघरी जाऊन चाचपणी सुरू केली आहे.
आरक्षणामुळे बिघडले गणित
अनेक प्रभागांमध्ये प्रस्थापितांना आरक्षणाअभावी विशेषकरून महिला आरक्षणामुळे स्वत:चे प्रभाग सोडण्याची वेळ आली आहे. अनेकांनी सुरक्षित प्रभागाचा शोध चालविला आहे. दुसऱ्या प्रभागामध्ये आपले अस्तित्व कसे कायम ठेवता येईल? यासाठी प्रस्थापित प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. एकूणच थंडीमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले आहे. सर्वांना प्रतीक्षा आहे ती निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची.
--------------------------