शिक्षक बदलीचे नवे धोरण, काही त्रुटी तशाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:13 IST2021-04-11T04:13:23+5:302021-04-11T04:13:23+5:30
अमरावती : जिल्हा परिषद शिक्षक बदलीचे आदेश राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने दिले आहेत. येत्या ३१ मे अखेर ...

शिक्षक बदलीचे नवे धोरण, काही त्रुटी तशाच
अमरावती : जिल्हा परिषद शिक्षक बदलीचे आदेश राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने दिले आहेत. येत्या ३१ मे अखेर ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासनादेशातील अनेक त्रुटी कायम असून, त्या दूर झालेल्या नाहीत. यामुळे गोंधळ कायम राहण्याची शक्यता आहे.
यापूर्वी जिल्हा परिषदेच्या गट ‘क‘ व गट ‘ड‘ कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत धोरण निश्चित केले होते. यानुसार शिक्षकांच्या बदल्या केल्या जात होत्या. परंतु शिक्षकांची मोठी संख्या व कामाचे भिन्न स्वरूप लक्षात घेऊन शासनाने यात बदल केला आहे. आता अवघड क्षेत्रात तीन वर्षे सेवा पूर्ण केलेले शिक्षक या बदलीसाठी पात्र ठरणार आहेत. विविध आजारांनी ग्रस्त असणाऱ्या शिक्षकांचा विशेष वर्गशिक्षक भाग एक मध्ये समावेश केला आहे. व्याधिग्रस्त शिक्षकांच्या जोडीदारांचा यात समावेश केला आहे. पती-पत्नी एकत्रीकरणाचा संवर्ग दोन मध्ये समावेश आहे. सलग १० अथवा पाच वर्षे सेवा झालेल्या शिक्षकच नव्या धोरणात बदलीस पात्र ठरतील. रिक्त जागा भरण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. याद्या प्रसिद्ध केल्यानंतर शिक्षकांकडून बदलीसाठी पसंतीक्रम घेतला जाईल. बदली प्रक्रिया सहा टप्प्यांत राबविली जाणार आहे. बदलीच्या ठिकाणी शिक्षक रुजू होत नसेल तर अशा शिक्षकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. बदली प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन राहील. राजकीय हस्तक्षेपाचा प्रयत्न झाल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. बदली गैरसोयीची असेल तर त्यासाठी समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीने दिलेल्या निर्णयाचे समाधान न झाल्यास संबंधित शिक्षकास विभागीय आयुक्तांकडे अपील करण्यास मुभा आहे.