नवे सोयाबीन आले अन् पाचशेने भाव पडले; मुहूर्तालाच घसरण
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: September 24, 2023 19:55 IST2023-09-24T19:54:32+5:302023-09-24T19:55:16+5:30
४६५० ते ४७४० रुपये भाव, उत्पादनखर्चही निघेना; व्यापाऱ्यांचे षड्यंत्र, शेतकऱ्यांचा आरोप.

नवे सोयाबीन आले अन् पाचशेने भाव पडले; मुहूर्तालाच घसरण
गजानन मोहोड, अमरावती : जूनमध्ये पावसाला विलंब, जुलैमध्ये अतिवृष्टी व ऑगस्टमध्ये पुन्हा खंड यामुळे यंदाचे सोयाबीन बाधित झाले व कीड, रोगांचा प्रादुर्भाव यामुळे सरासरी उत्पन्नात कमी आलेली आहे. अशा परिस्थितीत नवे सोयाबीन बाजारात येताच भावात क्विंटलमागे ५०० रुपयांनी घसरण झाली. उत्पादन खर्च निघण्याची शक्यता नसल्याने व्यापाऱ्यांचे षड्यंत्र असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
यंदा खरीप हंगामात मृग नक्षत्रात ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली होती ते सोयाबीन आता बाजार समितीमध्ये विक्रीला येत आहे. किंबहुना नव्या सोयाबीनची आवक वाढताच दरामध्ये क्विंटलमागे तब्बल ५०० रुपयांनी कमी आलेली आहे. शनिवारी येथील बाजार समितीमध्ये सोयाबीनची २१३४ पोत्यांची आवक झाली व ४६५० ते ४७४० रुपये भाव मिळाला आहे. महिनाभरापूर्वी सोयाबीनचे दर पाच हजार रुपयांवर पोहोचले होते.