विद्यापीठात आता पूनर्मूल्यांकनासाठी नवीन सॉफ्टवेअर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:14 IST2021-03-23T04:14:49+5:302021-03-23T04:14:49+5:30
अमरावती : केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार महाविद्यालये, विद्यापीठांचा कारभार हा ऑनलाईन आणि पेपरलेस असणे अपेक्षित आहे. त्याअनुषंगाने ...

विद्यापीठात आता पूनर्मूल्यांकनासाठी नवीन सॉफ्टवेअर
अमरावती : केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार महाविद्यालये, विद्यापीठांचा कारभार हा ऑनलाईन आणि पेपरलेस असणे अपेक्षित आहे. त्याअनुषंगाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने पुनर्मूल्यांकनासाठी नवीन सॉफ्टवेअर विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या काळात विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिका व उत्तरपत्रिकांची फोटो कॉपी ऑनलाईन मिळणार आहे. आता पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठात येण्याची गरज राहणार नाही.
कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या सूचनेनुसार नवीन सॉफ्टवेअरसाठी समिती नेमली जाणार आहे. आतापर्यंत विद्यापीठाने परीक्षा फार्म, नामांकन अर्ज, गुणपत्रिकांची सुविधा, परीक्षांचे हॉल तिकीट, प्रिंटर ते सेंटर पेपर, पीएच.डी. व्हायवा, नोटीफिकेशन, परीक्षकांचे अहवाल आदी परीक्षांशी निगडित बाबी ऑनलाईन केल्या आहेत. येत्या काळात पुनर्मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिका व उत्तरपत्रिकांची फोटो कॉपी ऑनलाईन दिली जाणार आहे. त्याकरिता पेमेंट गेट वेची सुविधा असणार आहे. यापूर्वी प्रत्येक परीक्षेत पुनर्मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिका मिळण्यासाठी ३० ते ४० हजार विद्यार्थी अर्ज करीत असून, फोटो कॉपीसाठी किमान पाच हजार अर्ज येत असल्याची माहिती आहे. मात्र, नवीन सॉफ्टवेअर आल्यानंतर घरीबसल्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका व उत्तरपत्रिकांची फोटो कॉपी ऑनलाईन मिळणार आहे.
-------------------
यूजीसीच्या गाईडलाईनुसार जवळपास परीक्षा विभागाचा कारभार ऑनलाईन झाला आहे. येत्या काळात पुनर्मूल्यांकनासाठी नवीन सॉफ्टवेअर विकसित होत आहे. त्याकरिता तज्ञ्जांची चमू नेमली जाणार आहे. त्यामुळे पुनर्मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिका व उत्तरपत्रिकांची फोटो कॉपी ऑनलाईन देता येईल.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन विभाग.
---------------
निकालानंतरची गर्दी थांबेल
परीक्षांचे निकाल जाहीर होताच अनुत्तीर्ण विद्यार्थी पुनर्मूल्यांकनासाठी विद्यापीठात गर्दी करतात, हा दरवेळेचा अनुभव आहे. मात्र, आता पुनर्मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिका व उत्तरपत्रिकांची फोटो कॉपी ऑनलाईन मिळणार आहे. त्यामुळे लांबचा प्रवास करून विद्यार्थ्यांना विद्यापीठात येणाची गरज राहणार नाही. मोबाईल अथवा ई-मेलद्धारे ऑनलाईन उत्तरपत्रिका व त्याची फोटो कॉपी सहजतेने उपलब्ध होईल. त्यामुळे निकालानंतर पुनर्मूल्यांकनासाठी होणारी गर्दी थांबेल, असा विश्वास प्रशासनाला आहे.