वणवा नियंत्रणासाठी नवे ‘सॅटेलाईट’
By Admin | Updated: February 25, 2017 00:01 IST2017-02-25T00:01:56+5:302017-02-25T00:01:56+5:30
उन्हाळ्यात जंगलात लागणाऱ्या आगीमुळे वनसंपदा नष्ट होते. वन्यजीव, सरपटणारे प्राणी होरपळून नामशेष होतात.

वणवा नियंत्रणासाठी नवे ‘सॅटेलाईट’
वनाधिकाऱ्यांना क्षणात माहिती : ‘मॉडिफ’ नावाचे सॉफ्टवेअर कार्यान्वित
अमरावती : उन्हाळ्यात जंगलात लागणाऱ्या आगीमुळे वनसंपदा नष्ट होते. वन्यजीव, सरपटणारे प्राणी होरपळून नामशेष होतात. तर लाखो हेक्टर जंगलाला क्षती पोहोचते. मात्र, आता जंगलातील आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अद्ययावत नव्या सॉफ्टवेअरचा वापर होत असून आगीची माहिती वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना क्षणात मिळत आहे.
उन्हाळा प्रारंभ झाला की जंगलात वनवणव्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. जंगलात आग लागल्यास ती परंपरागत पद्धतीने विझविली जाते. मात्र, उन्हाळ्यात जंगलात लागणारी आग ही त्वरेने पसरते. त्यामुळे काही तासांतच जंगल आगीने वेढले जाते. परंतु केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने देशभरातील जंगलात लागणाऱ्या आगीवर नियंत्रण आणि उपाययोजना करण्यासाठी नवे सॅटेलाईट विकसित केले आहे. हे सॅटेलाईट डेहरादून येथून नियंत्रित केले जात असून जंगलात आग लागल्यास ती क्षणात संबंधित अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर येते. नेमकी ही आग कोणत्या वनखंडात लागली. गाव, परिसराचा नकाशा, क्षेत्रपरिसर आदी माहिती मुख्य वनसंरक्षक, उपवनसंरक्षकांना मिळते. त्यामुळे वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना जंगलात लागलेल्या आगीची माहिती वनकर्मचाऱ्यांकडून मिळेल, हीपरंपरागत पद्धत कालबाह्य झाली आहे. जंगलातील आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नवे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. त्यानुसार सॅटेलाईटद्वारे जंगलातील आग आटोक्यात आणता येणार आहे. सॅटेलाईटद्वारे जंगलातील आगीची माहिती वरिष्ठ वनाधिकाऱ्यांंना मिळावी, यासाठी त्यांची केनेक्टिव्हीटी मोबाईलने जोडण्यात आली आहे. यापूर्वी जंगलात आग लागल्यानंतर वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना त्याआगीची माहिती उशिराने मिळायची. आगीबाबत अधिकाऱ्यांना वनकर्मचाऱ्यांवर अवलंबून रहावे लागत होते. परंतु आता जंगलात आग लागल्यास हीमाहिती सर्वात प्रथम वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहित होते. त्यानंतर या आगीची माहिती वनपाल, वनरक्षकांपर्यत पोहोचते. मेळघाट व्याघ्र प्रकल्प, प्रादेशिक वनविभागाने आगीवर नियंत्रणासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. जंगलात आग लागू नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
भानखेडा, वडाळीत आगीची माहिती मिळाली सॅटेलाईटवर
दोन दिवसांपूर्वी भानखेडा व वडाळी जंगलात अचानक किरकोळ आग लागल्याची माहिती सॅटेलाईटद्वारे उपवनसंरक्षकांना मोबाईलवर मिळाली. नेमकी कोणत्या वनखंडात लागली आग,गाव, क्षेत्र, गावाचा नकाशा, वनबीट आदी माहिती सॅटेलाईटने मिळणे सुकर झाले आहे.
‘नासा’ने जंगलातील आगीवर नियंत्रणासाठी मॉडेल विकसित केले आहे. आगीबाबत माहितीची २४ तास सेवा आहे. ‘मोडिफ’ नावाचे नवे सॉफ्टवेअर वापरले जात आहे. यावेळी दोन सॉफ्टवेअरचा वापर करुन सॅटेलाईटने जंगलातील आगीची माहिती मिळविली जात आहे.
- हेमंत मीणा, उपवनसंरक्षक, अमरावती.