खर्चिक विकासकामांची नव्याने उजळणी
By Admin | Updated: October 9, 2016 01:04 IST2016-10-09T01:04:52+5:302016-10-09T01:04:52+5:30
शहरात सुरू असलेल्या विविध कामांसह प्रस्तावित कामांची नव्याने उजळणी केली जाणार आहे.

खर्चिक विकासकामांची नव्याने उजळणी
आयुक्तांची ‘स्पॉट व्हिजिट’ : प्राधान्यक्रमाने होणार कामे
अमरावती : शहरात सुरू असलेल्या विविध कामांसह प्रस्तावित कामांची नव्याने उजळणी केली जाणार आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता आयुक्त हेमंत पवार यांनी हा सकारात्मक निर्णय घेतला आहे.
आयुक्तांनी शनिवारी शहरातील अनेक कामांना स्पॉट व्हिजिट दिली. त्यानंतर जी कामे आवश्यक आहेत, तसेच अत्याधिक महत्त्वाचे आहे, त्यालाच प्राधान्य देऊन ते पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. शहरात सध्या जी कामे सुरू आहेत, त्या कामाची खरंच आवश्यकता आहे का? हे तपासण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली.
हेमंत पवार यांनी शनिवारी शाम टॉकीज ते तहसील मार्गावरील अंडर ग्राउंड 'ड्रेनेज' या प्रस्तावित कामाची पाहणी केली. या ठिकाणी भूमिगत गटारे प्रस्तावित आहेत काय, याची तपासणी करावी, तसेच नालीची दुरुस्ती करून तेथे पार्किंगची व्यवस्था करण्याची सूचना केली. नारायणनगर येथील सवई यांच्या घरासमोर काँक्रीट रस्त्याऐवजी डांबरीकरणाचे २० मि.मी. कार्पेट घेण्यात यावे, कल्याणनगर ते प्रशांतनगर पुलापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरणाच्या सूचना त्यांनी दिल्या. पाहणीदरम्यान अनेक कामांमध्ये बदल आणि सुधारणा सुचवून सुधारित अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. कमीतकमी खर्चात नागरिकांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी यंत्रणेने पावले उचलावीत, पेव्हिंग ब्लॉक, उद्यानविकास, सौंदर्यीकरण करणे, कांक्रीट रस्ते ही कामे प्रस्तावित करू नयेत, अनावश्यक कामे बांधकाम विभागाने त्वरित नामंजूर करावी, अतिमहत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्यावे, अशा सूचना बांधकाम विभागातील अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत. साप्ताहिक सुटी असताना आयुक्तांनी मोजक्या विश्वस्तांना घेऊन हा दौरा केला.
महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता खर्चात काटकसर करणे, अगत्याचे आहे. त्याचवेळी अमरावतीकरांची कुठलीही गैरसोय होणार नाही, त्या अनुषंगाने पाहणी केली. अतिमहत्त्वाच्या कामांना प्राधान्य देण्यात येईल.
- हेमंत पवार, आयुक्त, महापालिका