अनिल कडू
परतवाडा :मेळघाट वन व वन्यजीव विभागांतर्गत अंगारमुक्त अभियानाच्या अनुषंगाने मेळघाटात ‘पुष्पा’फेम अल्लू अर्जुन व ‘सिंघम’फेम अजय देवगनची धूम बघायला मिळत आहे.
‘जंगल मे फायर नही, फ्लॉवर होने चाहिए’ असे अल्लू अर्जुन, तर ‘आली रे आली... आता जंगलाला आग लावणाऱ्यांची बारी आली’ असे अजय देवगन सुचवित असून तसे पोस्टर समाज माध्यमांवर फिरत आहेत. मेळघाटसह वन व वन्यजीव विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या व्हाॅट्सअप ग्रुपवर ते पोस्टर चांगलेच व्हायरल होत आहे. जंगलाला आग लावल्यास पाच हजार रुपये दंड किंवा दोन वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो, असा संदेश देत या पोस्टरवर १९२६ हा टोल फ्री सूचना क्रमांक दिला आहे.
मेळघाटातील जंगलाला दरवर्षी आगी लागतात. शेकडो हेक्टर जंगल जळून खाक होते. या आगी नैसर्गिक नाहीत, त्या मानवनिर्मित आहेत. या आगी आटोक्यात याव्यात, जंगलाला आग लागू नये, वनसंपदा नष्ट होऊ नये, याकरिता दोन वर्षांपासून मेळघाट जंगलक्षेत्रात अंगारमुक्त अभियान वन व वन्यजीव विभागाकडून परिणामकारक राबविले जात आहे.
अंगारमुक्त अभियानात स्थानिक लोकांचा सहभाग मिळावा म्हणून जनजागृती केली जाते. याकरिता स्वयंसेवी संस्थांची मदतही घेतली जाते. ज्या गावांनी आपल्या गावालगतच्या वनक्षेत्रात आगी लागू दिल्या नाहीत. त्या गावांना वनविभागाकडून मोठ्या रकमेचे पुरस्कारही दिले जातात. यावर्षी अंगारमुक्त अभियानाकडे सर्वांचे लक्ष वेधले जावे, याकरिता अल्लू अर्जुन व अजय देवगनचे हे पोस्टर लक्षवेधक ठरले आहेत.
साधारणतः जंगल क्षेत्रातील फायर लाईनची कामे संपल्यानंतर फेब्रुवारी ते जून अखेरपर्यंतपर्यंत हे अंगारमुक्त अभियान मेळघाट जंगल क्षेत्रात राबविली जाते. त्यानंतर स्पर्धेत सहभागी गावांचे मूल्यमापन करून, त्यांना सन्मानजनक असे पुरस्कार दिले जातात. या अभियानाअंतर्गत वनअधिकारी व कर्मचारीसुद्धा सतर्क असतात.