३१ गावांना मिळणार नवीन पोलीस पाटील
By Admin | Updated: September 17, 2015 00:18 IST2015-09-17T00:18:02+5:302015-09-17T00:18:02+5:30
गावात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी याकरिता प्रशासन व गावकरी यांच्यातील महत्त्वाची भूमिका...

३१ गावांना मिळणार नवीन पोलीस पाटील
चांदूरबाजार : गावात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी याकरिता प्रशासन व गावकरी यांच्यातील महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पोलीस पाटीलपदाची भरती प्रक्रिया ११ सप्टेंबर रोजी पूर्ण झाली. तालुक्यातील ३१ गावांमधील पोलीस पाटलांच्या पदभरतीसाठी उपविभागीय कार्यालय अचलपूर येथे ही प्रक्रिया संपूर्ण नियमावलीनुसार कार्यान्वित झाली आहे.
तालुक्यातील वडुरा, इमामपूर, लाखनवाडी, कोदोरी, आखदवाडा, दत्तापूर, जसापूर, निंभोरा, बऱ्हाणपूर, सैदापूर, तळवेल, परसोडा, बोराळा, शहापूर जवळा, दहिगाव, कोंडवर्धा, चिंचोली, बेलोरा तुळजापूर, बोरगाव मोहना, कुरळ, ब्राम्हणवाडा पाठक, बोदड, गोविंदपूर, जालनापूर, निमखेड, खेल चौधर, खेल खुशाल व खरपी या गावांच्या पोलीस पाटीलपदाच्या निवड प्रक्रियेचा जाहिरनामा २४ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध झाला आहे.
या पदासाठीची शैक्षणिक पात्रता १० वी उत्तीर्ण असून वयोमर्यादा २५ ते ४५ वर्षे आहे. अर्जदार हा ग्रामपंचायत सदस्य नसावा किंवा पूर्णवेळ नोकरी करणारा यासह अनेक शर्ती व अटी पोलीस पाटीलपदाकरिता ठेवण्यात आल्या आहेत. जाहिरनाम्यासह प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. अर्जाच्या छाननीनंतर उमेदवारांची ८० गुणांची लेखी परीक्षा प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे.
लेखी परीक्षेत ४५ टक्के गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे. त्यानंतर प्रथम तीन उमेदवारांना मुलाखतीकरिता बोलावण्यात येईल. लेखी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची तोंडी परीक्षा समितीमार्फत घेण्यात येणार आहे.
तसेच समान गुण मिळालेल्या उमेदवारांपैकी मयत अथवा सेवानिवृत्त पोलीस पाटलांचे वारसास प्राधान्य देण्यात येणार आहे.
पोलीस पाटलांच्या ३१ पदांपैकी १३ पदे खुल्या प्रवर्गासाठी तर चार पदे खुल्या महिला पदासाठी राखीव आहेत. इतर मागासवर्गाकरिता ४ पदे याच वर्गातील महिलांकरिता राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती महिलासाठी दोन पदे, विमुक्त जाती अ प्रवर्गासाठी तीन, अनुसूचित जाती एक, भटक्या जमाती 'क' १ व भटक्या जमाती 'क' महिलासाठी एक जागा याप्रमाणे सर्व पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहेत.
प्राप्त अर्जांची छाननी २३ सप्टेंबरला होणार असून ४ आॅक्टोबरला या पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. १९ आॅक्टोबर रोजी निकालाची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल. ही संपूर्ण प्रक्रिया उपविभागीय अधिकारी तथा पोलीस पाटील निवड समितीचे अध्यक्ष श्यामकांत म्हस्के यांच्या नियंत्रणाखाली पार पडत आहे. (शहर प्रतिनिधी)