बडनेऱ्यात नवे प्लॅटफार्म, ईलेक्ट्रॉनिक पायऱ्या
By Admin | Updated: July 2, 2016 00:08 IST2016-07-02T00:08:52+5:302016-07-02T00:08:52+5:30
बडनेरा रेल्वे स्थानकावर हल्ली चार प्लॅटफार्म असले तरी नव्याने पाचव्या क्रमांकाचे प्लॅटफार्म निर्माण करण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे.

बडनेऱ्यात नवे प्लॅटफार्म, ईलेक्ट्रॉनिक पायऱ्या
दक्षता समितीची बैठक : भुसावळ मंडळ वाणिज्य प्रबंधकांचा पाहणी दौरा
बडनेरा: बडनेरा रेल्वे स्थानकावर हल्ली चार प्लॅटफार्म असले तरी नव्याने पाचव्या क्रमांकाचे प्लॅटफार्म निर्माण करण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. रेल्वे अर्थसंकल्पात मंजूर स्वयंचलित पायऱ्या (एक्सेलेटर) निर्माण केले जाणार असल्याची माहिती भुसावळ मध्य रेल्वे विभागाचे मंडळ वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा यांनी शुक्रवारी प्रवासी दक्षता समितीच्या बैठकीत दिली. बडनेरा रेल्वे स्थानकावर प्रबंधकांच्या कार्यालयात पार पडलेल्या बैठकीला कार्यालय प्रमुख बी.बी. कांबळे, आर.टी. कोटंगळे, व्ही. डी. कुंभारे, वकील खान, स्टेशन प्रबंधक यू.ए. अनेकर, जीवन चौधरी, विश्वजित डुंबरे, सुखलाल कैथवास, मोहन शर्मा, निरंजन थोरात, अनिल श्रीखंडे, जीतू गुजरे, उमेश तायडे यांच्यासह सामाजिक, राजकीय संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सुनील मिश्रा यांनी रेल्वे प्रशासनाने भुसावळ विभागात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा सादर केला. गत दोन वर्षात रेल्वेने प्रवाशांसाठी उपलब्ध करुन दिलेल्या सुविधांची माहिती सादर केली. तसेच दिव्यांग प्रवाशांना रेल्वेत त्रास होऊ नये, यासाठी हॉट टाईट सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. मात्र स्वच्छतेसंदर्भात त्यांनी नाराजी व्यक्त करीत अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. मिश्रा यांनी रेल्वे स्थानकावर स्वच्छतेसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. पादचारी पूल निर्मितीचा प्रस्ताव मांडण्यात आला.