‘मुख्यमंत्र्यांचे आजोळ’ अमरावतीची नवी ओळख
By Admin | Updated: October 29, 2014 22:42 IST2014-10-29T22:42:16+5:302014-10-29T22:42:16+5:30
राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे आजोळ अशी नवी ओळख आता अंबानगरीला मिळणार आहे. भाजपचे राज्याचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान मिळविणारे देवेंद्र फडणवीस यांचे आजोळ अमरावतीचेच. येथील

‘मुख्यमंत्र्यांचे आजोळ’ अमरावतीची नवी ओळख
गडकरींचेही मामेकुळ : समान व्यक्तिमत्त्वाच्या धुरीणांनी घालविले बालपण
अमरावती : राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे आजोळ अशी नवी ओळख आता अंबानगरीला मिळणार आहे. भाजपचे राज्याचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान मिळविणारे देवेंद्र फडणवीस यांचे आजोळ अमरावतीचेच. येथील चंद्रकांत कलोती हे फडणवीसांचे मामा आहेत. ना. नितीन गडकरी हेदेखील एक महत्त्वाचे नेते. त्यांचेही मामेकुळ अमरावतीचेच. रहाटगावकर पांडेंच्या घरी त्यांचे सतत येणे-जाणे. फडणवीस आणि गडकरी यांच्या व्यक्तिमत्वातील साम्य बघता या दोघांचे आजोळही एकच असणे हा अमरावतीकरांसाठी दुग्धशर्करा योग म्हणावा लागेल.
गडकरी, फडणविसांची जोडी गुरू-शिष्यांची जोडी म्हणविली जाते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातही बरेच साम्य आहे. दोघेही अभ्यासू, व्यासंगी आणि दोघेही अजातशत्रू! अमरावतीच्या मातीत बागडलेले हे दोन दिग्गज केंद्र आणि राज्यातील सत्तांतरानंतर अत्यंत महत्त्वाची पदे भूषवित आहेत. नितीन गडकरी केंद्रात विराजमान असून देवेंद्र फडणवीस आता राज्याची धुरा पेलणार आहेत.
मंगळवारी भाजप विधिमंडळ सदस्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी फडणविसांच्या नावावर शिक्कामोर्तब करताच येथील बालाजी प्लॉट स्थित सीताराम बाबा मंदिर परिसरातील कलोती या फडणविसांच्या मामांच्या घरी जल्लोष साजरा झाला. गेल्या रविवारी नितीन गडकरी अमरावती येथे त्यांच्या मामांकडे दिवाळीनिमित्त येऊन गेलेत. दरवर्षी दिवाळीत मामांकडे येण्याचा गडकरींचा हा शिरस्ता भाजपचे कार्यकर्ते असल्यापासून केंद्रीय मंत्री असतानासुद्धा कायम आहे. मामाचे गाव प्रत्येकाच्याच आवडीचे असते. फडणविसांच्या मामांकडेही त्यांच्या अनेक सहृद्य आठवणी आहेत. त्यांच्या बालपणीचे अनेक किस्से आहेत. मुख्यमंत्र्यांच्या जडणघडणीचा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभल्याचे सांगून त्यांचे मामा आणि इतर नातलग गदगद होत आहेत. अमरावतीसाठीही ही गौरवाची बाब आहे. अवघ्या दीडशे किलोमीटरवर मुख्यमंत्र्यांंचे गाव आणि अमरावतीत आजोळ, क्या कहना!