२० ठिकाणी नवे कोविड केअर सेंटर, ४०० बेडही वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:13 IST2021-05-19T04:13:18+5:302021-05-19T04:13:18+5:30
अमरावती : ग्रामीण भागात वाढता कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार २० ...

२० ठिकाणी नवे कोविड केअर सेंटर, ४०० बेडही वाढणार
अमरावती : ग्रामीण भागात वाढता कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार २० प्राथमिक आरोग्य केंद्रात नवीन कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय जिल्हाभरात ४०० बेड वाढविले जाणार आहेत. याकरिता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन केले जात आहे. लवकरच कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी आरोग्य यंत्रणेचा भर आहे.
शहरापेक्षा गामीण भागात गत काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ज्या तालुक्यात रुग्णसंख्या जास्त आहे, अशा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी १५ ते २० बेड नव्याने उपलब्ध करून दिले जाणार आहेत. याकरिता जिल्हा परिषदेकडून सुमारे ४०० बेड नव्याने खरेदी करण्याची तयारी सुरू झाली आहे. यासोबतच प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या परिसरातील नागरिकांच्या चाचण्या केल्या जाणार आहेत. याकरिताही आरोग्य यंत्रणेने जिल्हाधिकारी व सीईओच्या सूचनेनुसार कार्यवाही सुरू केली आहे. सोबतच गावोगावी विनाकारण फिरणारे, गर्दी करणाऱ्यांची अँटिजेन चाचणी करण्यासाठी भरारी पथके गठित केली जाणार आहेत. यात आरोग्य, महसूल, पोलीस आदी विभागांतील कर्मचाऱ्याचा समावेश राहणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात नवीन कोविड सेंटरमध्ये सौम्य लक्षणे असलेल्या कोरोनाग्रस्तांवर उपचार केले जाणार आहेत. या ठिकाणी पुरेसा औषधी साठा उपलब्ध करून दिला जाणार आहे, तर रुग्णांची भोजन व्यवस्था स्थानिक महिला बचत गट किंवा ग्रामपंचायतीमार्फत केली जाणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
बाॅक्स
या याठिकाणी वाढणार बेड
शेंदूरजनाघाट, चांदस वाठोडा, नेरपिंगळाई, पिंपळखुटा, हिवरखेड, शिरजगांव कसबा, पथ्रोट, येसुर्णा, आमला येंडली, वाठोडा शुक्लेश्वर, काटकुंभ, डोमा, चिखली, सुसर्दा, गौरखेडा, निंबोली व अन्य ठिकाणी बेड संख्या वाढविली जाणार आहे.
कोट
ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता संसर्ग व रुग्ण संख्या लक्षात घेता, नवीन कोविड केअर सेंटर सुरू केले जाणार आहेत. या ठिकाणी ४०० बेड वाढविले जाणार आहे. याअनुषंगाने गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांना डिमांड मागविली आहे. यासंदर्भात माहिती प्राप्त होताच नवे बेड खरेदी केले जातील व आरोग्य सुविधा पुरविल्या जाणार आहेत.
अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी