पंचायत समितीची नवीन इमारत निरुपयोगी
By Admin | Updated: February 12, 2016 01:00 IST2016-02-12T01:00:24+5:302016-02-12T01:00:24+5:30
दोन कोटी रुपये खर्चून भव्य दिव्य अशी अचलपूर पंचायत समितीची गगणभेदी इमारत तयार करण्यात आली.

पंचायत समितीची नवीन इमारत निरुपयोगी
जुन्याच इमारतीत कामकाज : दोन कोटींची घोषणा, ४० लाखांची वानवा
नरेंद्र जावरे परतवाडा
दोन कोटी रुपये खर्चून भव्य दिव्य अशी अचलपूर पंचायत समितीची गगणभेदी इमारत तयार करण्यात आली. १० जानेवारी रोजी थाटात लोकार्पण सोहळासुद्धा पार पडला. मात्र एक महिना होऊनसुद्धा पंचायत समितीचे कामकाज जुन्याच इमारतीत सुरू आहे. अंतर्गत फर्निचरसाठी आवश्यक ४० लक्ष रुपयांचा निधीच शासन द्यायला तयार नसल्याचे दोन कोटींचा पांढरा हत्ती व तर दुसरीकडे देता का कुणी उधार फर्निचर म्हणायची वेळ अधिकाऱ्यांवर आली आहे.
ग्रामविकासाचा पाया भक्कम करण्यासाठी तालुकास्तरावर मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या पंचायत समितीचे कामकाज एकाच छताखाली यावे आणि जुन्या पडक्या व कालबाह्य झालेल्या इमारतीमधून नवीन इमारतीमध्ये सुस्थितीत कामकाज चालावे, यासाठी आघाडी शासनाने तालुक्यावरील पंचायत समिती इमारती मंजूर केल्या होत्या. ज्यांचे बांधकाम महायुतीच्या काळात पूर्ण झाले.
जवळपास दोन कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या इमारतीमध्ये काही ठिकाणी कामकाज सुरळीत सुरू झाले असताना मोठा गाजावाजा करुन लोकार्पण झालेली अचलपूर पंचायत समितीची भव्य वास्तू त्याला अपवाद ठरली आहे.
४० लाखांसाठी शासनाचे हात वर
अचलपूर पंचायत समितीच्या इमारतीचे बांधकामासाठी जवळपास दोन कोटी रुपये खर्च करण्यात आला. ग्रामविकास व जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार बच्चू कडू आदी मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य असा लोकार्पण सोहळा १० जानेवारी रोजी पार पडला. आता ज्या इमारतीमध्ये कर्मचारी अधिकाऱ्यांना बसण्यासाठी टेबल खुर्च्या, कपाट आदींची व्यवस्थाच नसल्याने पं.स.चे कामकाज महिना उलटूनही जुन्याच इमारतीमधून सुरू आहे. शासनाकडे फर्निचरसाठी निधीच नसल्याने २ कोटींची इमारत एकाच महिन्यात पांढरा हत्ती ठरल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.