सर्वच बँकांमध्ये नवीन चलनाचे व्यवहार सुरळीत
By Admin | Updated: November 11, 2016 00:29 IST2016-11-11T00:29:39+5:302016-11-11T00:29:39+5:30
केंद्र शासनाने मंगळवारी मध्यरात्रीपासून देशात ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला.

सर्वच बँकांमध्ये नवीन चलनाचे व्यवहार सुरळीत
जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी : आजपासून एटीएमवर नवीन नोटा
अमरावती : केंद्र शासनाने मंगळवारी मध्यरात्रीपासून देशात ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व बँकांमध्ये नवीन चलनाचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवण्यात आला आहे. निर्देशानुसार ग्राहकांना जुन्या नोटा बदलून नवीन चलन देणे, जुन्या नोटा डिपॉझिट म्हणून स्वीकारणे आणि मर्यादेनुसार त्यांना पेमेंट देण्यासाठी जादा काऊंटर उघडलेले आहेत. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी गुरुवारी स्टेट बँकेच्या शहरातील कँप शाखेत व श्याम चौकातील मुख्य शाखेला भेट देऊन पाहणी केली. बँक व्यवस्थापकांना आवश्यक निर्देश देऊन ग्राहकांना योग्य सोयी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. त्यांच्यासमवेत पोलीस उपायुक्त आयुक्त विवेक पानसरे उपस्थित होते.
शहरातील कँप शाखेतील सहायक महाप्रबंधक रमेशकुमार सिंह यांनी जिल्हाधिकारी गित्ते व पोलीस उपायुक्त पानसरे यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी बँकेतील गर्दीत ग्राहकांशी चर्चा केली. बँकेकडून स्वतंत्रपणे एक्सचेंजसाठी व डिपॉझिट, पेमेंट तथा शासकीय पेमेंटसाठी स्वतंत्र चार काऊंटर सुरू केले आहेत. दोन हजार रुपयांचे नवीन चलन ग्राहकांना देण्यात येत आहेत. ११ नोव्हेंबरपासून एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. सद्य:स्थितीत १०० रुपयांच्या नोटांचा तुटवडा लक्षात घेता एटीएमवर १०० रुपयांच्या नोटा उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती सहाय्यक महाप्रबंधक रमेशकुमार सिंह यांनी जिल्हाधिकारी गित्ते यांना दिली. स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाम चौकातील मुख्य शाखेला जिल्हाधिकारी गिते यांनी भेट देऊन पाहणी केली. तेथेही मोठ्या रांगा दिसून आल्यात. सर्व व्यवहार शांततेत चालू ठेवावेत, कायदा सुव्यवस्था निर्माण होणार नाही तसेच व्यवस्थेचा दुरुपयोग होणार नाही , याची बँक प्रशासनाने काळजी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी त्यांनी दिल्यात. (प्रतिनिधी)