दारुड्याच्या अंत्यसंस्कारासाठी नातलगांचा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2017 00:20 IST2017-05-03T00:20:45+5:302017-05-03T00:20:45+5:30
जिवंतपणी दारू पिऊन कुटुंबियांना हैराण करणाऱ्या दारूड्याच्या मृत्युनंतर कुटुंबियांनी त्याच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार करण्यासही चक्क नकार दिला.

दारुड्याच्या अंत्यसंस्कारासाठी नातलगांचा नकार
पोलिसांनी केली मनधरणी : अखेरीस जबरदस्तीने आणले इर्विनमध्ये
अमरावती : जिवंतपणी दारू पिऊन कुटुंबियांना हैराण करणाऱ्या दारूड्याच्या मृत्युनंतर कुटुंबियांनी त्याच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार करण्यासही चक्क नकार दिला. मात्र, शवविच्छेदनाची कारवाई व अंत्यसंस्कार करण्याचे किमान सोपस्कार तरी कुटुंबियांनी पूर्ण करावेत, यासाठी पोलिसांनी मृताच्या कुटुंबियांनी अक्षरश: मनधरणी केली. शेवटी धाक दाखवून त्यांना इर्विनमध्ये आणल्यानंतर पुढील प्रक्रिया पार पडली.
बडनेरा नवीवस्तीतील गजानननगर परिसरात सोमवारी एका इसमाचा मृतदेह आढळून आला होता. बडनेरा पोलीस ठाण्याचे एएसआय दिवाकर काळबांडे व पोलीस शिपाई हितेंद्र देवपारे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून स्वखर्चाने हा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला. चौकशीअंती तो मृतदेह मारोती रामाजी कुरवाळे (५०,रा.फुकटनगर, बडनेरा) याचा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न केले. मृताच्या भावाला पोलिसांनी माहिती दिली. मात्र, काही कामानिमित्त बाहेरगावी असल्याचे सांगून त्याने वेळ मारून नेली. त्यामुळे अन्य नातेवाईकांना इर्विन रुग्णालयात शवविच्छेदन प्रक्रियेसंदर्भात पाठविण्याची विनंती पोलिसांनी मृताच्या भावाला केली. मात्र, त्याने योग्य प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पोलिसांनी मृताचे घर गाठून त्याच्या बहिणीशी संपर्क केला. मात्र, ‘आम्हाला मारोतीसोबत काही घेणे-देणे’ नसल्याचे सांगून त्यांनीही पार्थिव ताब्यात घेण्यासाठी नकार दिला. त्यामुळे पोलिसांसमोर पुन्हा पेच निर्माण झाला. पोलिसांनी मृताच्या अन्य नातेवाईकांची सुद्धा मनधरणी केली. मात्र, कोणीच मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पुढे आले नाही. अनोळखी मृतदेहाला तीन दिवस ठेवल्यानंतर पोलीस शवविच्छेदन प्रक्रिया आटोपतात, असा नियम आहे. मात्र, मृताचे नातेवाईक असताना त्यांच्या उपस्थितीशिवाय शवविच्छेदन करणे, बेकायदेशिर असल्याने नाईलाजास्तव पोलिसांना नातलगांची मनधरणी केली. इतकेच नव्हे तर अंत्यविधीचा सर्व खर्च करण्याची तयारी देखील दर्शविली. पोस्टमार्टमच्या दस्तऐवजांवर सह्या करा, पुढील अंत्यविधी आम्हीच करू, असे आश्वासन पोलिसांनी नातलंगाना दिले. मात्र, तरी सुुद्धा नातलग पोलिसांसोबत येण्यास तयार नव्हते. अखेर पोलिसी खाक्या धाक दाखवून मृताच्या नातलगांना पोलीस जीपमध्ये बसवून जबरदस्तीने इर्विन रूग्णालयात आणले. त्यानंतर दुपारी ४ वाजताच्या सुमारास शवविच्छेदन प्रक्रिया पार पडली आणि मारोती कुरवाळे यांच्या पार्थिवावर अत्यसंस्कार करण्यात आलेत. दारूड्याचे पार्थिव स्वीकारण्यास नातलगांनी नकार दिल्याने पोलिसांना मात्र विचित्र पेचाचा सामना करावा लागला.
बडनेऱ्यातील गजाननगरात मारोती कुरवाळे नामक व्यक्ती मृतावस्थेत आढळून आला. शवविच्छेदनासाठी नातेवाईकांना बोलविण्यात आले. मात्र, त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यांना अनेकदा विनवणी केली. मात्र, ते आले नाहीत. अखेर दुपारी पोलीस जीपमध्ये बसवून त्यांना आणावे लागले.
- दिवाकर काळबांडे,
सहायक पोलीस उपनिरीक्षक, बडनेरा पोलीस ठाणे.