जिल्ह्याचा समृद्ध वनवारसा जपण्याची गरज
By Admin | Updated: March 20, 2016 23:58 IST2016-03-20T23:58:39+5:302016-03-20T23:58:39+5:30
पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास यामुळे 'ग्लोबल वॉर्मिंग’ हा शब्द अलीकडे अधिकच ऐकण्यात येतो.

जिल्ह्याचा समृद्ध वनवारसा जपण्याची गरज
वैभव बाबरेकर अमरावती
पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास यामुळे 'ग्लोबल वॉर्मिंग’ हा शब्द अलीकडे अधिकच ऐकण्यात येतो. जागतिक वनदिन साजरा करताना पर्यावरण संवर्धनाशी निगडित प्रत्येक घटकावर सर्वंकष विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. मानवी वस्त्या जंगलांना खेटू लागल्या आहेत. ही बाब जंगलांसाठी धोकादायक ठरणारी आहे. वृक्षतोडीमुळे दिवसेंदिवस शहरालगतच्या आॅक्सिजन बँकेवर मोठा परिणाम होत आहे. जिल्ह्यातील वनवैभव मानवी वस्त्यांच्या विळख्यात सापडले आहे. हळूहळू या वनवैभवाचा ऱ्हास होत चालला आहे. जागतिक वनदिन साजरा करताना जिल्ह्याचे हरवलेले वनवैभव परत आणण्याचा संकल्प प्रत्येकाने करायला हवा.
चाणक्य विचारसरणीत तसेच शिवाजी महाराजांच्या राज्यात वनसंवर्धनाला अतिशय महत्त्व होते. परंतु आधुनिक काळात मानवाची वनांचा उपभोग घेण्याची प्रवृत्ती वाढत गेली. वाढती लोकसंख्या, शहरीकरण, जंगलतोड, औद्योगिकरण, वनजमिनीवर अतिक्रमण, गुरांची अधिक संख्या व कुरणक्षेत्राच्या जागा मनुष्य वस्त्यांनी बळकावल्यामुळे वनांवर मोठा ताण वाढला आहे. जंगलाचे कमी होणारे प्रमाण हा एक चिंतेचा विषय बनला आहे. जल, जमीन आणि जंगल यांचे नात ेअतिशय घट्ट आहे. वने आहेत म्हणून नद्यांना पाणी आहे. वने आहेत म्हणून मानवाला प्राणवायू मिळतो. म्हणजेच वनांमुळेच मानव व प्राणी जीवन जगू शकताहेत.
जिल्ह्याचे एकूण वनक्षेत्र- ३,५७७ चौरस किमी असून त्यामध्ये पोहरा, मालखेड राखीव जंगल आहे. या जंगलात खैर, हिवर, पळस, बोर आदी विविध प्रकारचे वृक्ष आढळून येतात. इतकेच नव्हे तर वाघ, बिबट, रानकुत्रा, तडस, कोल्हा, रानमांजर, उदमांजर, अस्वल, गवा, चितळ, सांबर, नीलगाय, काळवीट हे वन्यपशूदेखील या जंगलात आढळून येतात. जिल्ह्यात शुष्क पानगळी प्रकारचे अरण्य असून पूर्व मेळघाट, पश्चिम मेळघाट, मेळघाट व्याघ्र प्रकल्प व गुगामल राष्ट्रीय उद्यान तसेच महेंद्री व पोहरा-मालखेड सारख्या राखीव जंगलात वनसंपदा टिकून आहे. मात्र, मागील काही वर्षांत जंगले शहरीकरणाच्या कचाट्यात सापडली आहेत. अमरावती जिल्ह्याला वनांचा समृध्द वारसा लाभलाय. तो कायमस्वरुपी टिकविणे मानवाच्या हाती आहे. जागतिक वन दिन सारा करताना वनसंरक्षणाचा संकल्प करायलाच हवा.