मेळघाटात वनौषधी निर्मिती प्रकल्पाची गरज
By Admin | Updated: November 4, 2014 22:33 IST2014-11-04T22:33:16+5:302014-11-04T22:33:16+5:30
मेळघाटात वनौषधींचा मोठ्या प्रमाणावर ठेवा आहे. महाराष्ट्रात १५० कुळांचे वनौषधी आहेत. यातील ९७ कूळ वनौषधी एकट्या मेळघाटात असल्याच्या नोंदी आहेत. मात्र या बहुमूल्य वनौषधीला तस्करांनी आपले

मेळघाटात वनौषधी निर्मिती प्रकल्पाची गरज
श्यामकांत पाण्डेय - धारणी
मेळघाटात वनौषधींचा मोठ्या प्रमाणावर ठेवा आहे. महाराष्ट्रात १५० कुळांचे वनौषधी आहेत. यातील ९७ कूळ वनौषधी एकट्या मेळघाटात असल्याच्या नोंदी आहेत. मात्र या बहुमूल्य वनौषधीला तस्करांनी आपले लक्ष्य केले आहे. यामुळे वनौषधी लोप पावण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळेच तस्करीवर प्रतिबंध घालून मेळघाटात वनौषधी निर्मिती प्रकल्प उभारण्याची गरज आहे.
मेळघाटातील दुर्मीळ, अतीदुर्मीळ आणि सामान्य वनौषधींसंदर्भात अनेकांनी येथे येऊन अध्ययन केले आणि ही संपूर्ण माहिती पुस्तक स्वरुपात तयार केली. सर्वप्रथम कॅप्टन वीट यांनी मेळघाटातील वनौषधीबाबत अभ्यास करुन पुस्तक स्वरुपात ही माहिती जतन केली आहे. १९३५ मध्ये पटेल यांनी येथील वनौषधी संदर्भातील पुस्तक तयार केले, तर १९८८ साली बाबासाहेब ढोरे यांनी मेळघाटचा अभ्यास करुन ही माहिती साठवून ठेवली. या अभ्यासकांनी केलेले संशोधन व लिखाणावरुन मेळघाटातील वनौषधींबाबतचे महत्त्व विशद होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात दुर्मीळ वनौषधी मेळघाटात असताना त्याचे जनत करण्यासाठी शासनाकडून कोणतेही प्रयत्न केले गेले नाही. येथे व्याघ्र प्रकल्पाची स्थापना करुन बहुमूल्य वनौषधीला दुय्यम स्थान देण्यात आले.
यातच वनविभागाच्या दुर्लक्षामुळे वाघ व इतर वन्यप्राण्यांच्या शिकारीसह वनौषधी तस्करीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मेळघाटात आढळणाऱ्या वनौषधींमध्ये ३९८ जाती व ७१५ प्रजातींचा समावेश आहे. यात वृक्ष वर्गीय, झुडुपी वर्गीय व कंद वर्गीय वनौषधींचा समावेश आहे.