अपघातात गंभीर जखमी आकाशला मदतीची गरज
By Admin | Updated: December 21, 2015 00:03 IST2015-12-21T00:03:04+5:302015-12-21T00:03:04+5:30
येथील कॅम्प भागात रक्ताच्या थारोळ्यात आढळलेला २४ वर्षीय आकाश नागपूरच्या क्रिम्स हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे.

अपघातात गंभीर जखमी आकाशला मदतीची गरज
झुंज सुरू : मेंदू अन् जबड्याची शल्यक्रिया
अमरावती : येथील कॅम्प भागात रक्ताच्या थारोळ्यात आढळलेला २४ वर्षीय आकाश नागपूरच्या क्रिम्स हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. अचानक ओढवलेल्या या प्रसंगाचा आर्थिक सामना करण्याची क्षमता त्याच्या कुटुंबीयांची नाही. समाजातील दानशुरांनी मदत करून आकाशला नवजीवन देण्याची विनंती त्याच्या कुटुंबीयांनी केली आहे.
आकाशची सैन्यदलात निवड झाली होती. त्यासाठी त्याला परराज्यात जावे लागणार होते. तत्पूर्वी महाराष्ट्रातील पोलीस भरतीची तो तयारी करीत होता. त्यासाठी सैन्यदलातून तीन महिन्यांचा अवधी त्याने मागितला होता. त्याचे श्रमसाफल्य मूर्त स्वरुपात साकारण्यापूर्वीच नियतीने डाव खेळला.
अपघात कसा झाला हे सांगायला कुणीही साक्षीदार नाही. आकाशलाही त्याबाबतची स्मृती नाही. १६ रोजी दुचाकी आणि आकाश कॅम्प परिसरात पडलेले होते. आकाशच्या डोक्यातून भळाभळा रक्त वाहत होते. कुण्या संवेदनशील व्यक्तीने त्याला जिल्हा रुग्णालयात हलविले. त्यानंतर तातडीने त्याला नागपूरला हलविण्यात आले. त्याच्या मेंदूवर आणि जबड्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
डॉक्टरांनी त्याच्या इलाजाचा खर्च साडेचार लक्ष रुपये सांगितला आहे. अकाशवर बराच इलाज होणे बाकी आहे. पैशांअभावी इलाजात व्यत्यय निर्माण झाला आहे. इच्छुकांनी मदत करण्याची विनंती त्याच्या कुटुंबीयांनी केली आहे.
नागपूर येथील क्रिम्स रुग्णालयाच्या बँक आॅफ इंडियाच्या ८७०६३०११०००००४० या क्रमांकाच्या खात्यात रक्कम जमा करता येईल. 'क्रिम्स लिमिटेड' या नावाने धनादेश वा डीडी जारी करता येतील.