लिंबू पिकाची क्षेत्रवाढ गरजेची
By Admin | Updated: September 15, 2015 00:10 IST2015-09-15T00:10:50+5:302015-09-15T00:10:50+5:30
सर्व ऋतूत व वर्षभर उपलब्ध असणाऱ्या लिंबांना मोठ्या प्रमाणावर मागणी व बाजारपेठ उपलब्ध असताना जिल्ह्यात केवळ २६७.५६ हेक्टर लिंबूचे क्षेत्र आहे.

लिंबू पिकाची क्षेत्रवाढ गरजेची
कृषी विभागाने घ्यावा पुढाकार : जिल्ह्यात केवळ २६७ हेक्टर क्षेत्र
लोकमत विशेष
अमरावती : सर्व ऋतूत व वर्षभर उपलब्ध असणाऱ्या लिंबांना मोठ्या प्रमाणावर मागणी व बाजारपेठ उपलब्ध असताना जिल्ह्यात केवळ २६७.५६ हेक्टर लिंबूचे क्षेत्र आहे. इतर फळपिकांपेक्षा कमी पाणी व मध्यम प्रकारच्या जमिनीतही हे पीक सहज घेता येते. वातावरणातील बदल व कीडरोगामुळे अन्य फळपिकांच्या सरासरी उत्पादनात घट येत असताना लिंबूने शेतकऱ्यांना साथ दिली आहे. लिंबूच्या क्षेत्रवाढीसाठी कृषी विभागाने पुढाकार घेतल्यास ही स्थिती कायम राहणार आहे.
दररोजच्या जेवणात लिंबू हा अविभाज्य घटक आहे, सौंदर्यप्रसाधनांसाठी लिंबाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. लिंबांपासून लोणचे व विविध खाद्यपदार्थ बनतात, उन्हाळ्यात तर लिंबाला जोरदार मागणी असते. मात्र, त्या तुलनेत जिल्ह्यात लिंबांची उत्पादकता कमी असल्याने लिंबाची भाववाढ व टंचाई असते. लिंबू हे बारमाही पीक असल्याने अन्य पिकांच्या तुलनेत लिंबूचे उत्पादन मात्र हमखास होते.
जिल्ह्यातील सर्व प्रकारची जमीन ही लिंबूवर्गीय पिकांसाठी अनुकूल आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानात लिंबू लागवडीसाठी योजना असताना जिल्ह्यातील क्षेत्रवाढ झालेली नाही. जिल्ह्यात सद्यस्थितीत २६७.५६ हेक्टरमध्ये लिंबूची लागवड आहे. २४०७.५ मेट्रिक टन उत्पादकता आहे. तालुकानिहाय क्षेत्र पाहता अमरावती तालुक्यात १४.२५ हेक्टर, भातकुली ८.५३ हेक्टर, चांदूररेल्वे १२.१० हेक्टर, धामणगाव ८.३८, नांदगाव खंडेश्वर ८३.९६ हेक्टर, मोर्शी २६.४१ हेक्टर, वरूड ६.५५ हेक्टर, तिवसा ३५.०३ हेक्टर, चांदूरबाजार ३.२४ हेक्टर, अचलपूर २ हेक्टर, अंजनगाव सुर्जी ५८.२१ हेक्टर, चिखलदरा ४० आर, धारणी ४.५० हेक्टर क्षेत्र आहे. या पिकाची क्षेत्रवाढ झाल्यास प्रतिकूल स्थितीत शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल. (प्रतिनिधी)
लिंबू या फळपिकाचे तीन बहर घेता येतात. उन्हाळ्याच्या सोयीने बहराचे नियोजन केल्यास अधिक भाव मिळतो, कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या वाणाची लागवड केल्यास शेतकऱ्यांना फायदा होतो.
- योगेश इंगळे,
कृषी शास्त्रज्ञ, प्रादेशिक संशोधन केंद्र.