आरोग्य विभागात जिवतंपणा आणण्याची आवश्यकता
By Admin | Updated: November 15, 2014 01:11 IST2014-11-15T01:11:28+5:302014-11-15T01:11:28+5:30
शुक्रवारी दुपारी १२ वाजता आ. सुनील देशमुख यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन आरोग यंत्रणेची व्यवस्था पाहिली.

आरोग्य विभागात जिवतंपणा आणण्याची आवश्यकता
अमरावती : शुक्रवारी दुपारी १२ वाजता आ. सुनील देशमुख यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन आरोग यंत्रणेची व्यवस्था पाहिली. यावेळी आरोग्य विभागात जिवंतपणा आणण्याची गरज आहे, अशा सूचना जिल्हा शल्य चिकित्सक, अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली.
'लोकमत'ने जिल्हा सामान्य रुग्णालयाची भयावह व्यवस्था वृत्ताच्या माध्यमातून उघड केली आहे. रुग्णालयातील दुरवस्थेचे दर्शन घडविणारे वृत्त प्रकाशित केल्याने जिल्हा आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. या अनुषंगाने जिल्हा आरोग्य विभाग सतर्क झाला असून शुक्रवारी दुपारी १२ वाजता दरम्यान नवनिर्वाचित आमदार सुनील देशमुख यांनीही जिल्हा सामान्य रुग्णालयातील समस्यांचा आढावा घेतला. तोकडा मनुष्यबळ, आरोग्य यंत्रणेतील बिघाड, डॉक्टरांचा निष्काळजीपणा तसेच अस्वच्छता या सर्व मुद्द्यांवर सुनील देशमुखांनी भर देऊन रुग्णालयातील पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. या सर्व समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने देशमुख यांनी रुग्णालयातील प्रमुखांशी चर्चा करुन त्यांना आरोग्य सेवा सुधारण्याबाबत सूचना दिल्यात. यावेळी इर्विनमधील अस्वच्छता पाहून सुनील देशमुख संतप्त झाले होते. आईसीयुमधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा अनुभव त्यांना येताच त्यांनी संबंधित डॉक्टरांना तंबीसुध्दा दिली. अस्वच्छेतेबद्दल अधिकाऱ्यांना धारेधर धरले. इर्विनमधील थॅलीसिमिया विभागाची त्यांनी पाहणी करुन तेथील व्यवस्था पाहून कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. तसेच मधुमेह दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी मार्गदर्शन केले. अशा भोंगळ कारभाराने जिल्हाभरातून आशा घेऊन आलेल्या गोरगरीब रुग्णांचे हाल होत आहे. ‘यावर उपाययोजना करून रुग्णांना योग्य सेवा द्या. यंत्रणा सुस्थितीत आणा. हे तुमच्या पातळीवर होत नसेल तर मला सांगा. मी हे करवून घेईल’, असे आ. देशमुख यांनी जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत यांना बजावले.
यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक अशोक वणकर, अन्य आरोग्यसेवा देणाऱ्या पदाधिकारी, अनिल पाटील, नगरसेवक अंबादास जावरे, उमेश घुरडे, प्रभात गवळी, अकिल, अहमद खान, बिलाल खान, गिरीश मेहता यांच्यासह आदींची यावेळी उपस्थिती होती. (प्रतिनिधी)