राष्ट्रवादीला दोनच मतदारसंघ मिळणार!

By Admin | Updated: August 18, 2014 23:15 IST2014-08-18T23:15:23+5:302014-08-18T23:15:23+5:30

येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीची औपचारिक घोषणा झाली असली तरी दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची तयारी चालविली आहे.

NCP will get two seats! | राष्ट्रवादीला दोनच मतदारसंघ मिळणार!

राष्ट्रवादीला दोनच मतदारसंघ मिळणार!

गणेश वासनिक - अमरावती
येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीची औपचारिक घोषणा झाली असली तरी दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची तयारी चालविली आहे. मात्र, आघाडी झाल्यास जिल्ह्यातील आठ मतदारसंघांपैकी बडनेरा व मोर्शी हे दोनच मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्याची काँग्रेसची तयारी आहे.
रविवारी मुंबई येथील टिळक भवनात काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यात जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारही सहभागी झाले होते. अमरावती, अचलपूर, मेळघाट, दर्यापूर, धामणगाव रेल्वे व तिवसा या मतदारसंघांसाठी काँग्रेसच्या मुलाखती पार पडल्या. बडनेरा व मोर्शी विधानसभा मतदारसंघ वगळता सहाही मतदारसंघांकरिता मुलाखती घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ दोनच मतदारसंघ देण्याची काँग्रेसची तयारी असल्याचे स्पष्ट होत आहे.
जिल्ह्यात सध्या काँग्रेसचे चार आमदार असून या आमदारांचे चारही मतदारसंघ काँग्रेसकडेच कायम राहतील. मात्र, ज्या मतदारसंघात काँग्रेसची ताकद पूर्वीपेक्षा वाढली आहे, ते अचलपूर आणि दर्यापूर हे दोन मतदारसंघ काँग्रेसच्याच वाट्याला यावेत, यासाठी स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांकडे ‘लॉबिंग’ चालविली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचा अचलपूर मतदारसंघावर डोळा असल्याने हा मतदारसंघ काँग्रेसच्याच ताब्यात राहावा, यासाठी स्थानिक काँग्रेस नेत्यांनी ही बाब मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आवर्जून मांडल्याची माहिती आहे. एवढेच नव्हे, तर अचलपूर मतदारसंघ राष्ट्रवादीला देणार नाही, असा शब्द काँग्रेसच्या वरिष्ठांनी दिल्याने या मतदारसंघात इच्छुकांची तूर्तास ‘बल्ले बल्ले’ आहे.
राष्ट्रवादीची राजकीय ताकद बघता दोन मतदारसंघ त्यांच्यासाठी पुरेसे असल्याचे मत काँग्रेसच्या नेत्यांचे आहे. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपरिषदेतील संख्याबळ आणि सर्वाधिक आमदार काँग्रेसचे असल्याने विधानसभा निवडणुकीत अधिक मतदारसंघ मिळावेत, अशी काँग्रेसच्या नेत्यांची अपेक्षा आहे.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मिळालेली मतांची टक्केवारी काँग्रेसच्या मदतीनेच गाठता आल्याचे स्थानिक नेत्यांचे मत आहे. जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची ताकद अधिक असल्याने आठही मतदारसंघात उमेदवार रिंगणात उतरविण्याची तयारी आहे. मात्र, आघाडी झाल्यास राष्ट्रवादीला केवळ मोर्शी व बडनेरा हे दोनच मतदारसंघ देण्याची मानसिकता काँग्रेसची असल्याचे दिसून येते.
काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी राज्यातील विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय घेत आघाडी कायम ठेवण्याचे ठरविले होते. मात्र, एखाद्या मतदारसंघात सलग दोन वेळा पराभव झाला असल्यास व यावेळी हा मतदारसंघ मित्रपक्षाने मागितल्यास तो सोडावा लागेल, असे सूत्रही ठरविले. त्यामुळे नव्या निकषानुसार अचलपूर मतदारसंघ राष्ट्रवादीने ताब्यात घेण्याची तयारी सुरु केली आहे. जागा वाटपाच्या वेळी आघाडीच्या नेत्यांमध्ये अचलपूर मतदारसंघासाठी बरीच रस्सीखेच होण्याचे संकेत आहेत. अशातच लोकसभा निवडणुकीत मेळघाटात राष्ट्रवादीच्या उमेदवारांना अधिक मते मिळाल्याने हा मतदारसंघ मिळविण्याची जोरदार तयारी राकाँने चालविली आहे.
अचलपूर आणि मेळघाट मतदारसंघाच्या वाटपावरुन आघाडीत बराच वाद उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षातील नेत्यांची आघाडी व्हावी, अशी इच्छा आहे. मात्र, जागा वाटपाचे परंपरागत सूत्र कायम राहूनच आघाडी व्हावी, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. राष्ट्रवादीनेदेखील दोनपेक्षा अधिक जागा पदरात पाडून घेण्याची रणनीती आखली असून यात किती यश येते हे लवकरच स्पष्ट होईल.

Web Title: NCP will get two seats!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.