राष्ट्रवादीही रस्त्यावर
By Admin | Updated: January 10, 2017 00:08 IST2017-01-10T00:08:16+5:302017-01-10T00:08:16+5:30
केंद्राच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

राष्ट्रवादीही रस्त्यावर
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध
अमरावती : केंद्राच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या अन्यायी निर्णयाबद्दल भाजप शासनाचा निषेध करण्यासाठी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे इर्विन चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना राकाँचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, शहराध्यक्ष बाबा राठोड व ज्येष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन दिले. आर्थिक स्थैर्यासाठी काळा पैसा नष्ट केला जात असेल तर अशा निर्णयाचे राकाँने स्वागतच केले. परंतु पूर्वनियोजन नसल्याने या निर्णयामुळे सामान्य जनतेची कोंडी झाली आहे, अशा प्रतिक्रिया राकाँच्या नेत्यांनी मोर्चाला संबोधित करताना व्यक्त केल्यात.
शेतकऱ्यांचा आक्रोश
अमरावती : नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असून सर्व व्यापार तसेच दैनंदिन व्यवहार मंदावले आहेत. अतिरिक्त कामाच्या बोजामुळे बँकेचे कर्मचारी हैराण झाले आहेत. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी आक्रोश व्यक्त करीत आहेत. शासनाच्या या धोरणांच्या निषेधार्थ राकाँच्यावतीने ९ जानेवारीला रोजी दुपारी १ वाजता जिल्हाकचेरीवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, शहराध्यक्ष बाबा राठोड, माजीमंत्री शरद तसरे, वसुधा देशमुख, माजी अध्यक्ष विजय भैसे, अरूण गावंडे, बाबूराव बेलसरे, प्रल्हाद सुंदरकर, शेखर भोयर, निलिमा महल्ले, गणेश रॉय, गजानन रेवाळकर, विजय बाभुळकर, दीपक नागपुरे, आनंद गुल्हाने, सुचिता वनवे, भास्कर ठाकरे, प्रवीण मेश्राम, जानराव डहाके, स्मिता घोगरे, राजेंद्र अग्रवाल, विनोद तलवारे, मनोहर गुल्हाने, सय्यद शकील, विश्वासराव मोरे, मातकर, ज्योती वानखडे, मोहन जाखड आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
नोटाबंदीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली
कापूस, सोयाबीन उत्पादकांसह ग्रामीण जनता नोटबंदीमुळे हैराण झाली आहे. शेतकऱ्यांची दुरवस्था झाली आहे. त्यांच्या शेतमालाला मिळत असलेला अत्यल्प भाव, बँकांचे खोळंबलेले व्यवहार यामुळे ग्रामीणांचे कंबरडे मोडले आहे. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदी करण्यात आल्याचा दावा सरकार करीत असले तरी आतापर्यंत किती काळा पैसा जमा झाला, असा सवाल राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे यांनी उपस्थित केला. नोटाबंदीच्या काळात जिल्ह्यात किती काळा पैसा जमा झाला,असा प्रश्न यावेळी राकाँच्या नेत्यांनी उपस्थित केला.नोटाबंदीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पीक भरपूर आले असताना सुद्धा भाव नसल्याने शेतकरी आत्महत्यांचा मार्ग स्वीकारत असल्याचा आरोप सुनील वऱ्हाडे यांनी केला आहे.