नवरदेवाचा नियोजित विवाह उरकला
By Admin | Updated: November 16, 2015 00:24 IST2015-11-16T00:24:18+5:302015-11-16T00:24:18+5:30
मूळचा लेहेगाव येथील एका सैनिकाचे नियोजित लग्न मूर्तिजापूर तालुक्यातील अंभोरा येथे सोमवारी सकाळी उरकले.

नवरदेवाचा नियोजित विवाह उरकला
अमरावती : मूळचा लेहेगाव येथील एका सैनिकाचे नियोजित लग्न मूर्तिजापूर तालुक्यातील अंभोरा येथे सोमवारी सकाळी उरकले. मात्र, आपण सदर सैनिकाची पहिली पत्नी असल्याचा दावा करणारी महिला रविवारी दिवसभर आपल्याला न्याय मिळण्यासाठी खल्लार पोलीस ठाण्यात बसून होती. मात्र, तिच्याकडे पहिले लग्न झाल्याचा कुठलाही पुरावा नसल्याने व हे प्रकरण शेगाव तालुक्यातील असल्याने खल्लार पोलिसांनी शेगाव पोलिसात या प्रकरणाचा चेंडू टोलवल्याचे कळते. शनिवारी खल्लार येथील नवरदेवाची घोड्यावर वरात निघाली. परंतु या नवरदेवासोबत आपले एक वर्षापूर्वीच शेगाव येथे लग्न झाल्याचा दावा करणाऱ्या महिलेने दर्यापूर पोलिसात धाव घेतल्याने येथील एका उपनिरीक्षकाच्या मदतीने नवरदेवाला अर्ध्यावरातीतूनच तपासासाठी ताब्यात घेतले होते.
शनिवारी खल्लार येथे एकच खळबळ उडाली. परंतु नवरदेवाला नंतर सोडून देण्यात आले. त्याने मूर्तिजापूर तालुक्यात आपल्या नियोजित वधूसोबत विवाह करुन त्या नववधूला खल्लार येथे आणले. परंतु त्याची पहिली पत्नी असल्याचे सांगून खल्लार पोलिसात तिने धाव घेतल्याने आज दिवसभर उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. परंतु तिच्याकडे त्या नवरदेवासोबत पहिले लग्न झाल्याचा कुठलाही पुरावा नसल्याने व घटनास्थळ शेगाव असल्याने खल्लार पोलिसांनी सदर महिलेची समजूत काढून तिला शेगाव येथे तक्रार देण्यास सांगितले. (प्रतिनिधी)