नवरात्रौेत्सव प्रारंभ अंबा-एकवीरा देवी मंदिरांत भक्तांचा जनसागर
By Admin | Updated: October 14, 2015 00:12 IST2015-10-14T00:12:41+5:302015-10-14T00:12:41+5:30
आदिमायेच्या उत्सवाला अंबानगरीत मंगळवारी जल्लोषात सुरुवात झाली.

नवरात्रौेत्सव प्रारंभ अंबा-एकवीरा देवी मंदिरांत भक्तांचा जनसागर
अंबानगरीत ४७८ दुर्गादेवी, ५० शारदादेवी विराजमान
अमरावती : आदिमायेच्या उत्सवाला अंबानगरीत मंगळवारी जल्लोषात सुरुवात झाली. शहरात ४७८ दुर्गा तर ५० शारदादेवींची प्रतिष्ठापना करण्यात आली. अंबा-एकवीरेच्या दर्शनासाठी भक्तांचा सागर उसळला आहे. मंदिर परिसरात दर्शनार्थींच्या मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत. नवरात्रोत्सवानिमित्त पोलिसांनी अंबा-एकवीरा मंदिर परिसरासह शहरात ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
दरवर्षी डीजेच्या तालावर दुर्गोत्सव साजरा करण्याची पध्दत यंदा मोडीत निघाली. दुर्गोत्सव मंडळांनी परंपरागत वाद्यांच्या तालावर,लेझिम, आतषबाजी आणि भजनांच्या नादात जगदंबेची मिरवणूक काढली.‘दुर्गा माता की जय, शारदा देवी की जय’ या घोषणांनी शहरातील रस्ते दणाणून गेले होते. गुलालाची उधळण केली.
३४ ठिकाणी रंगणार गरबा
आदिमायेची आराधना करण्याचा पारंपारिक आणि लोकप्रिय प्रकार म्हणजे गरबा. नवरात्रीच्या नऊ दिवसांत शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ३४ ठिकाणी गरबा रंगणार आहे. याठिकाणी गरबा आयोजनाला पोलिसांनी परवानगी दिली असून मंगळवारी रात्रीपासून शहरात गरब्याची धूम पाहायला मिळणार आहे.
नियमबाह्य वाहतुकीवर कारवाई
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायदा १९८८ व मुंबई पोलीस कायदा १९५१ अन्वये कारवाई करण्यात येईल, असे शहर पोलीस उपायुक्त, सोमनाथ घार्गे यांनी कळविले.