नवरदेव बोहल्यावर चढला अन् गजाआड झाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:11 IST2021-06-02T04:11:52+5:302021-06-02T04:11:52+5:30
चिखलदरा : अमरावती येथील खासगी रुग्णालयात परिचारिकेचे काम करणाऱ्या युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिचा दोन वेळा गर्भपात करणाऱ्या ...

नवरदेव बोहल्यावर चढला अन् गजाआड झाला
चिखलदरा : अमरावती येथील खासगी रुग्णालयात परिचारिकेचे काम करणाऱ्या युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिचा दोन वेळा गर्भपात करणाऱ्या नवरदेवाला सोमवारी अटक करण्यात आली. विशेष म्हणजे, तो ३० मे रोजीच पीडिताव्यतिरिक्त अन्य तरुणीसोबत बोहल्यावर चढला होता.
कमलेश गुलाब राऊत (२८, रा. तेलखार, हल्ली मुक्काम रा. कौशल्या विहार रंगोली लॉन्सजवळ, नरसाळा, परतवाडा) असे आरोपीचे नाव आहे. तालुक्यातील एका तरुणीला त्याने लग्नाचे आमिष दिले. दोन बहिणींचे लग्न झाल्यावर आपण लग्न करू, असे खोटे सांगितले. वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याने तिला दोन वेळा गर्भधारणा झाली. अखेर आठवड्यापूर्वी त्याने भिन्न जातीचे कारण सांगून युवतीशी संबंध तोडले.
बॉक्स
मोबाईल ब्लॉक, गुपचूप लग्न
आरोपी कमलेशने शारीरिक सुखासाठी माझा गैरफायदा घेतला. आठवड्यापासून त्याने संबंध तोडले. मोबाईल नंबरसुद्धा ब्लॅाक केला. अचानक ३० मे रोजी दुसऱ्या मुलीशी लग्न केले, अशी तक्रार पीडिताने चिखलदरा पोलिसांत दाखल केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.
कोट
लग्नाचे आमिष दाखवून युवतीशी वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित केले व दुसरीशी विवाह केला. या फिर्यादीवरून आरोपीला ताब्यात घेतले असून, गुन्हा नोंदविला.
- राहुल वाढवे, ठाणेदार, चिखलदरा