नवनीत राणा यांनी सीपींकडे सोपविले अडसुळांविरुद्धचे पुरावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 10:48 PM2018-08-06T22:48:48+5:302018-08-06T22:49:08+5:30

खासदार आनंदराव अडसुळ यांच्याविरुद्धचे पुरावे नवनीत राणा यांनी सोमवारी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांना सोपविले. तत्पूर्वी, नवनीत राणा यांच्यासह युवा स्वाभिमानच्या शेकडो महिला कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तालयावर धडक मोर्चा नेला होता.

Navneet Rana's evidence against the handler for the seal | नवनीत राणा यांनी सीपींकडे सोपविले अडसुळांविरुद्धचे पुरावे

नवनीत राणा यांनी सीपींकडे सोपविले अडसुळांविरुद्धचे पुरावे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : खासदार आनंदराव अडसुळ यांच्याविरुद्धचे पुरावे नवनीत राणा यांनी सोमवारी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांना सोपविले. तत्पूर्वी, नवनीत राणा यांच्यासह युवा स्वाभिमानच्या शेकडो महिला कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तालयावर धडक मोर्चा नेला होता.
नवनीत राणा व महिला कार्यकर्त्यांना प्रवेशद्वाराच रोखण्यात आले. यानंतर काही महिला कार्यकर्त्यांना घेऊन त्यांनी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांची भेट घेतली. खा. अडसुळांनी आ. रवि राणा यांना राजकारणातून संपविण्यासाठी व स्वत:चे राजकीय वर्चस्व जोपासण्यासाठी षड्यंत्र रचल्याचे नवनीत राणा यांनी सीपींना सांगितले. खा. अडसुळांच्या सांगण्यावरून जयंत वंजारी, सुनील भालेराव व कार्तीक शहा यांनी मला शिवीगाळ करून ब्लॅकमेल केले आणि खंडणी मागितली. याशिवाय चारित्र्यहीन हा शब्द वापरला. हा प्रकार महिलांची बदनामी करणारा असून, त्यांनी अमरावतीमधील समस्त महिलांचा अपमान केल्याचे त्यांनी सीपींना सांगितले. ब्लॅकमेलिंग, धमकी, शिवीगाळ व खंडणी वसुली, दस्तावेजांची हेराफेरी यासंदर्भातील सर्व पुरावे, याशिवाय कॉल रेकॉडिंग, सीडी, व्हिडीओ क्लिप, आॅडिओ क्लिप, फेसबूक क्लिप, व्हॉट्सअ‍ॅप डेटा, नवनीत राणा यांच्या बाजूने लागलेल्या निकालाची प्रत तसेच तब्बल १२३ एकत्रित कॉलचे डिटेल्स नवनीत राणा यांनी सीपी बाविस्कर यांच्याकडे सोपविले. हे सर्व पुरावे तपासून खा. अडसुळांसह त्यांच्या सहकार्यांवर कठोर कारवाई करावी, त्याच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात अटक करावी, अशी मागणी नवनीत राणा यांनी पोलीस आयुक्तांकडे केली.
डीसीपी सातव करणार अडसुळांच्या तक्रारीची चौकशी
खा. आनंदराव अडसूळ यांनी दिलेल्या तक्रारीची चौकशी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांच्याकडे सोपविली आहे. ते योग्य व पारदर्शक तपास करून अहवाल सादर करतील, त्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती बाविस्कर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
पोलीस उपायुक्तांची धावपळ
शिवसैनिक व महिलांचा एकापाठोपाठ मोर्चा पोलीस आयुक्तालयावर धडकला. पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला असतानाही अनेक कार्यकर्ते पोलीस आयुक्तांच्या दालनापर्यंत पोहोचले. आयुक्तांच्या कक्षात शिरण्याचा अनेक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना त्यांना मज्जाव केला. या बंदोबस्ताची धुरा सांभाळताना डीसीपी शशिकांत सातव व प्रदीप चव्हाण यांची चांगलीच तारांबळ उडाली. कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी नियोजन करताना पोलीस उपायुक्त धावपळ करीत होते.
पोलीस आयुक्तांनी माध्यमांना टाळले
खा.अडसूळ व नवनीत राणा यांनी एकापाठोपाठ सीपींची भेट घेतली. शहरातील ही मोठी घडामोड होती. त्यावेळी माध्यम प्रतिनिधींना कटाक्षाने आयुक्तांच्या दालनात प्रवेश नाकारण्यात आला. दोन्ही पक्ष गेल्यावर माध्यम प्रतिनिधी सीपींची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी गेले. त्यावेळी अगदीच जुजबी उत्तर देत, टेबलवर हात आपटून, स्वत:ची खुर्ची त्यांनी दूर सारली. त्यांच्या या देहबोलीमुळे आणखी काही न विचारता प्रतिनिधी बाहेर पडले.
नवनीत राणांच्या तक्रारीची चौकशी करणार डीसीपी निवा जैन
पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी नवनीत राणा यांच्या तक्रारीची चौकशी पोलीस उपायुक्त निवा जैन यांच्याकडे सोपविली आहे. नवनीत राणा यांनी दिलेल्या पुराव्यातील तथ्यांचा अभ्यास करून दोषींवर कारवाई होईल, अशी माहिती बाविस्कर यांनी दिली.

दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी निवेदन देऊन आपआपल्या तक्रारी दिल्या. पारदर्शकतेने तपास करून दोषींवर कारवाई केली जाईल. डीसीपी शशिकांत सातव व निवा जैन यांच्याकडे चौकशी सोपविली आहे.
- संजयकुमार बाविस्कर
पोलीस आयुक्त.

Web Title: Navneet Rana's evidence against the handler for the seal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.