नवनीत राणा यांची न्यायालयात हजेरी
By Admin | Updated: October 6, 2015 00:35 IST2015-10-06T00:35:37+5:302015-10-06T00:35:37+5:30
शेतकऱ्यांच्या कापसाला हमीभाव मिळवून देण्यासाठी नवनीत राणा यांनी वलगाव रेल्वे क्रॉसिंगवर केलेल्या रास्तारोको आंदोलनाचा खटला सोमवारपासून सुरू झाला.

नवनीत राणा यांची न्यायालयात हजेरी
खटल्याची सुनावणी सुरू : वलगाव रेल्वे क्रॉसिंगवरील आंदोलन
अमरावती : शेतकऱ्यांच्या कापसाला हमीभाव मिळवून देण्यासाठी नवनीत राणा यांनी वलगाव रेल्वे क्रॉसिंगवर केलेल्या रास्तारोको आंदोलनाचा खटला सोमवारपासून सुरू झाला. यावेळी नवनीत राणा यांच्यासह २० कार्यकर्त्यांनी न्यायालयात हजेरी लावली.
शेतकऱ्यांना कापसाचा हमीभाव मिळवून देण्यासाठी आ. रवी राणा यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी आंदोलने केलीत. त्यावेळी रवी राणा यांच्यासह आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी आ. राणा यांच्यासह कार्यकर्त्यांना मध्यवर्ती कारागृहात ठेवले होते. दरम्यान १३ आॅक्टोबर २०१३ रोजी आ.राणा यांची पत्नी नवनीत राणा यांच्यासह मेघा हरणे, अश्विनी झोड, ज्योती सैरीसे व अन्य २० कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या हितार्थ वलगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील रेल्वे क्रॉसिंगवर रास्तारोको आंदोलन केले.
यावेळी नवनीत राणा यांच्यासह सर्व आंदोलनकर्त्यांवर वलगाव पोलिसांनी कलम १३५ बीपी अॅक्ट व भादंविच्या कलम १४७, १४८ अन्वये गुन्हा दाखल केला होता. वलगाव ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शिरीष राठोड यांनी नवनीत राणा यांच्यासह कार्यकर्त्याना अटक केली होती. याप्रकरणाची चौकशी करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपत्र सादर केले असून सोमवारपासून खटल्याला सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने नवनीत राणा यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (न्यायालय क्रमांक ६) प्रगती येरलेकर यांच्या न्यायालयात हजेरी लावली. बचाव पक्षाकडून वकील दीप मिश्रा यांनी न्यायालयात युक्तिवाद केला आहे. (प्रतिनिधी)