Navneet Rana meets today on drought, water shortage | दुष्काळ, पाणीटंचाईसंदर्भात नवनीत राणांची आज बैठक
दुष्काळ, पाणीटंचाईसंदर्भात नवनीत राणांची आज बैठक

ठळक मुद्देप्रशासनाचा आढावा : उपाययोजना अन् तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील दुष्काळस्थिती व पाणीटंचाईसाठी काय उपाययोजना सुरू आहेत, यासंदर्भात बैठक लावण्याची सूचना नवनिर्वाचित खासदार नवनीत राणा यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना केली होती. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने सोमवारी बैठक आयोजित केली आहे.
नवनिर्वाचित खासदार नवनीत राणा यांच्या विजयाचा जल्लोष जिल्हाभरात सुरू आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांची व चाहत्यांची दररोज गर्दी होत आहे. दररोज त्यांची रॅलीदेखील निघत असताना जिल्ह्यातील दुष्काळस्थिती व पाणीटंचाई या विषयांवर आपण गंभीर असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी पहिल्याच दिवशी जिल्हा प्रशासनाला दाखवून देत आगामी वाटचालीचे संकेत दिले आहे.
प्रचारादरम्यान जिल्ह्यातील या भयावह स्थितीची जाणीव खासदार राणा यांना झाली. त्यामुळे यासंदर्भात काय उपाययोजना सुरू आहे, त्या कामांवर तरतूद करण्यात आलेली आहे काय? याबाबतचा आढावा घेण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी लावली आहे. या बैठकीला आमदार, जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य यांनादेखील बोलाविण्याच्या सूचना खासदार नवनीत राणा यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.
सरासरीपेक्षा कमी पावसामुळे जिल्ह्यात सर्वच तालुक्यात दुष्काळस्थिती आहे. भूजलाचे पुनर्भरण न झाल्यामुळे सद्यस्थितीत ३०० वर गावांत जलसंकट निर्माण झाले आहे. पाणीटंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच आहे. दोन महिने आचारसंहिता सुरू असल्याने पुरेशा प्रमाणात उपाययोजना झालेल्या नाहीत, किंबहुना जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेतले नसल्यामुळेच जलसंकटाची तीव्रता वाढली आहे.


Web Title: Navneet Rana meets today on drought, water shortage
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.