नवऱ्याने सोडली साथ, भावाने केला घात
By Admin | Updated: July 12, 2014 23:24 IST2014-07-12T23:24:33+5:302014-07-12T23:24:33+5:30
व्यसनाधिन भावाने बहिणीला पेटवून तिची हत्या केल्याची घटना खल्लार गावात घडली. सीमा रामचंद्र खंडारे (३३, रा. खल्लार) असे मृताचे नाव आहे.

नवऱ्याने सोडली साथ, भावाने केला घात
परित्यक्त महिलेची भावाकडून हत्या : खल्लार येथील घटना
दर्यापूर/ खल्लार : व्यसनाधिन भावाने बहिणीला पेटवून तिची हत्या केल्याची घटना खल्लार गावात घडली. सीमा रामचंद्र खंडारे (३३, रा. खल्लार) असे मृताचे नाव आहे.
सीमा खंडारे ही पतीपासून विभक्त होऊन खल्लार येथे माहेरी राहात होती. दुपारी ४ वाजता सीमाचा भाऊ विजय चक्रे तिच्याकडे आला व त्याने दारुसाठी पैशाची मागणी केली. मात्र, भावाच्या दररोजच्या व्यसनाला कंटाळलेल्या सीमाने पैसे देण्यास नकार दिला.
संतापलेल्या विजयने शिवीगाळ करीत तिच्यासोबत वादविवाद केला. वाद विकोपाला जाताच विजयने घरातील रॉकेल सीमाच्या अंगावर ओतून तिला पेटवून दिले व तेथून पळ काढला. सीमा हीने आरडाओरड केल्याने घरातील अन्य मंडळी व परिसरातील नागरिक धावून आले. त्यांनी सीमाला विझविले. यात ती ९६ टक्के भाजली गेली. तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पहाटे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी खल्लार पोलिसांनी विजय चक्रेविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
दोन्ही संसारात अपयशी
पहिल्या विवाहानंतर काही दिवसांतच काडीमोड झाला. दुसरा संसार थाटला. त्यालाही गालबोट लागले. दुसऱ्या नवऱ्याला सोडून ती माहेरी भावाच्या आश्रयाने आली.
दारुसाठी पैसे न दिल्याने बहिणीला पेटविले
दारुड्या भावाने आपल्या लहान बहिणीने दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून तिला पेटवून हत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री खल्लार येथे घडली.
सीमा रामचंद्र खंडारे (३५, रा. खल्लार), असे मृताचे नाव आहे. दहा वर्षांपूर्वी तिचा विवाह झाला होता. परंतु काही दिवसांमध्येच पती-पत्नीत खटके उडणे सुरु झाले. परिणामी सीमा ही पतीला सोडून खल्लार येथे आपल्या भावाच्या आश्रयाने माहेरी राहू लागली. सुमारे दहा वर्षांपासून ती माहेरी राहत होती. दरम्यान दीड ते दोन वर्षांनंतर तिला नजीकच्या गौरखेडा येथील स्थळ आले. रामचंद्र खंडारे या राज्य राखीव दलाच्या जवानासोबत तिचा दुसरा विवाह झाला. एका महिन्यातच दोघांमध्ये खटके उडाले आणि पुन्हा काडीमोड झाला. ती खल्लार या आपल्या माहेरी रहायला आली.
तिला दोन मोठे भाऊ आहेत. यातील विजय संपतराव चक्रे हा मधला भाऊ. तो पूर्णपणे दारुच्या आहारी गेलेला. त्याने शुक्रवारी दुपारी ४ वाजता बहिण सीमाला दारु पिण्यासाठी पैशाची मागणी केली. परंतु सीमाने दारु पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटविल्याचे सीमाने मृत्यूपूर्व बयाणात म्हटले आहे. ९६ टक्के भाजलेल्या अवस्थेत अमरावतीच्या इर्विन रुग्णालयात तिचा शुक्रवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला.